प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
मणीनें लिहिलेले ग्रंथ - मणीनें पुष्कळ ग्रंथ व निबंध लिहिले पण त्यांपैकीं आतां फारच थोडे उपलब्ध आहेत. फिहरिस्तवरून पाहतां, त्यानें, सहा सिरिअक व एक पर्शियन भाषेमध्यें, असे सात महत्त्वांचे ग्रंथ लिहिले. त्यांची नांवें :- १. रहस्यासंबंधीं पुस्तक; ह्यांत पूर्वेकडील ख्रिस्ती धर्मपंथाचें विवरण व टीका आहे २. महापुरुषां (राक्षसां?) संबंधीं पुस्तक. ३. श्रोत्यांकरितां आदेश असलेलें पुस्तक; ह्यांत थोडक्यांत श्रेष्ठांत श्रेष्ठ व प्रमाणभूत मानलेलीं तत्त्वें दिलीं आहेत. ४. शापुरकानाविषयीं पुस्तक :- केस्लरच्या मतें हें एक शापुरराजाला लिहिलेलें पत्र आहे. ५. उद्दीपनावर पुस्तक. ६. आचाराचें ? पुस्तक (विषय अज्ञात). ७. पर्शियन भाषेंत लिहिलेला एक ग्रंथ; - ह्याचें नांव फिहरिस्तमध्यें दिलें नाहीं; परंतु हें मणिसंप्रदायाचें 'पवित्र शुभवर्तमान' असावें.