प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
मॅसिडोनियन साम्राज्य - अलेक्झांडरनें इराण कसें जिंकलें व आपली सत्ता जगभर कशी पसरविली हें येथें देण्यास अवकाश नाहीं. तथापि महत्त्वाची गोष्ट ही कीं, गॉगमीलच्या विजयानंतर (१, आक्टो. ३३१), व विशेषतः दरायसच्या खुनानंतर अलेक्झांडर हा स्वतःला इराणी साम्राज्याचा कायदेशीर अधिपति मानून इराणी राजांचा पोषाख वापरूं लागला व त्यांचे सर्व संस्कार पाळूं लागला.
इराणी साम्राज्यांतील मुख्य शहरें काबीज होतांच इराणी युद्ध संपलें व अलेक्झांडरची जगावरील मोहीम सुरू झाली. जग जिंकण्याकरितां मॅसिडोनिया व ग्रीस यांमधील सैन्य अर्थातच अपुरें होतें. परंतु अलेक्झांडरनें मॅसिडोनियन, ग्रीक लोक आणि इराणी लोक यांमध्यें भेदभाव न मानतां या दोन्ही लोकांनां एकत्र करण्याचा यत्न केला. इराणी लोकांनां तो आपल्या जगड्व्याळ राज्याचा दुसरा आधारस्तंभच मानीत असे. त्यानें सुसा येथें (फेब्रु. ३२४) सर्व ग्रीक वरिष्ठ अधिकारी व इतर १०००० मॅसिडोनियन लोक यांचीं इराणी बायकांशीं लग्नें लावून या दोन जाती संलग्न केल्या; व तरुण इराणी शिपायांनां मॅसिडोनियन पद्धतीवर लष्करी शिक्षण देऊन त्यांची सैन्यांत भरती केली व मॅसिडोनियाच्या कसलेल्या शिपायांस स्वदेशी परत जाण्यांस परवानगी दिली. ३२४ मध्यें ओलिम्पिआच्या उत्सवप्रसंगीं त्यानें, सर्व ग्रीक शहरांनीं आपणास ईश्वर मानून स्वदेशी परत येणार्या शिपायांनां पुन्हां समाजांत घ्यावें असा हुकूम सोडला. ख्रि. पू. ३२३ मध्यें अरबस्थान जिंकण्याची पूर्ण तयारी झाली व तो जिंकल्यावर पश्चिमेकडील मोहीम, कार्थेज व इटालियन लोक यांवरील स्वारी या गोष्टी होतीं घ्यावयाचा अलेक्झांडरचा बेत होता. परंतु याच सुमारास ख्रि. पू. ३२३ मध्यें बाबिलोनमध्यें अलेक्झांडर मरण पावून त्याचे हे सर्व बेत जागच्या जागीं राहिले.