प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

व्यापार व जमाबंदी - राज्यव्यवस्थेच्या बाबतींत जसे इराणी राज्याचे प्रांत परस्पर भिन्न होते त्याचप्रमाणें विनिमयपद्धतीच्या दृष्टीनें देखील या प्रांतांत भिन्नपणा दिसून येतो. अगदीं पश्चिमेस लिडियन व ग्रीक लोकांत सरकारनें अथवा स्वायत्त समाजानें पाडलेलीं नाणीं वापरण्याची विकास पावलेली पद्धत ख्रि. पू. सातव्या शतकापासूनच प्रचारांत होती. इजिप्‍त, सिरिया, फिनीशिया, व बाबिलोनिया या देशांत प्रत्येक व्यवहाराच्या वेळीं सोन्यारुप्याच्या कांबी मोजण्याची जुनी व्यापारपद्धति प्रचलित होती. या देशांत नाणीं केवळ ख्रि. पू. ४ थ्या शतकापासूनच प्रचारांत आलीं. उलट पक्षीं पूर्वेकडील प्रदेशांत एक वस्तु देऊन तिच्या मोबदल्यांत दुसरी घेण्याची प्राथमिकावस्थेंतील अडाणी पद्धत चालू होती. तथापि सोनें सांपडणार्‍या हिंदुस्थानच्या सरहद्दीच्या प्रांतांत (पंजाबांत) मात्र नाण्यांची पद्धत प्राचीन काळींच स्वीकारण्यांत आली असून तेथें इराणी व ॲटिक नाण्यांचा सार्वत्रिक प्रसार झाला होता. ख्रि. पू. पांचव्या व चौथ्या शतकांत या भागांत इराणी व ॲटिक नाण्यांप्रमाणें नाणीं पाडण्यांत आलीं होतीं. या निरनिराळ्या प्रकारच्या नाण्यांच्या पद्धतींशीं तोंड देऊन सरकारला त्यांचा शक्य तितका मेळ बसवावा लागे. दरबारांत ''नैसर्गिक विनिमयपद्धती'' चाच नेहमीं उपयोग करण्यांत येत असे. बडे अधिकारी व पौरस्त्य सैनिक यांनां धान्यरूपानें वेतन मिळत असे. यांच्या जेवण्याखाण्याची सोय राजाच्या भोजनगृहांतच होत असे; व शिवाय त्यांनां देणग्या व जमिनी बहाल करण्यांत येत. ग्रीक शिपायांनां मात्र नाण्यांच्या रूपानें वेतन द्यावें लागे, व शिवाय राजालाहि नाण्यांची गरज असे. म्हणून राजाचे कर अंशतः पैशाच्या रूपानें व अंशतः घोडे, गुरें, धान्य, कापड व इतर उद्योगधंद्यांची निपज यांच्या रूपानें घेतले जात असत. क्षत्रपसुद्धां पैशाच्या रूपानें कर घेऊन शिवाय आपल्या भोजनगृहाकरितां वर्गणी गोळा करीत असत. क्षत्रपांच्या या भोजनगृहांत त्यांच्या अधिकार्‍यांच्या जेवण्याची व्यवस्था होत असे.