प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
विश्ववाङ्मयांत बौद्ध वाङ्मयांतील अंतर्भूत करण्यासारखा अवशिष्ट अंश - वाङ्मय व ग्रंथोत्पत्तीसंबंधानें पाहतां आपल्या चालू काळांतील आधुनिक बौद्धसांप्रदायिक चळवळ निष्फळ झाली असल्याचें दिसतें. भाषान्तर ग्रंथ वगळले तर निवडक वेंचे, प्रश्नोत्तरमाला व हलक्या दर्जाचे स्वमतप्रवर्तक लेख यांपलीकडे क्वचितच मजल गेली आहे. यूरोप आणि अमेरिका या खंडांमध्यें ज्याच्या प्रसाराचें काम चालू आहे त्या अर्वाचीन बौद्धसंप्रदायाकडे पाहतां. आपणांस असें दिसतें कीं, आयुष्यक्रमाला नवीन वळण लावण्याकरितां चालू असलेल्या धडपडीमुळें आपल्या हातून घडत असलेल्या अनेक चुकांपैकीं ही एक चूक आहे. हें जरी खरें आहे, तरी बौद्धसंप्रदाय व बौद्धवाङ्मयग्रंथ यांतील ज्या जीवनशक्तीच्या योगानें सर्व राष्ट्रांमधील कवींच्या व विचारवंतांच्या मनाला सदोदित पुनः पुन्हां स्फूर्ति मिळत आली व मिळत आहे त्या जीवनशक्तीचें कौतुक करणें आपणांस प्राप्त आहे. विंटरनिट्झ याच्या मतें जो यूरोपखंडांतील विविध वाङ्मयांमध्यें घेतला जाऊन विश्ववाङ्मयांतील सार्वजनिक ज्ञानधनाच्या स्वरूपांत येण्यास लायक आहे असा बौद्धवाङ्मयांत अजूनहि पुष्कळ भाग शिल्लक आहे.