प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

संप्रदायाचा विकास - प्रांतांच्या अधिकारी वर्गातील सरदाराप्रमाणें सांप्रदायिक नायकांचेंहि वजन मोठें होतें. प्रत्येक मोठ्या जिल्ह्यावर एक वरिष्ठ मॅजिअन असे, व या सर्व मॅजिअनांचा मुख्य मोबेद असे, व तो रॅगी येथे रहात असे. राजा व प्रजा या दोहोंचा संप्रदाय झरथुष्ट्राचाच असल्यामुळें या लोकांच्या हातीं बरीच सत्ता होती. अकिमिनियन काळानंतर इराणी संप्रदायाचा जास्त जास्तच प्रसार झाला. इंडो-सिथियन राज्यांत इराणी देवतांची उपासना लोक मोठ्या भक्तीनें करीत असत; आर्मीनियांतील राष्ट्रीय धर्माचा बहुतेक र्‍हास होऊन त्याच्या ऐवजीं इराणी संप्रदायच चालू झाला होता. कॅप्पाडोशियांत, उत्तर सिरियांत व आशियामायनरच्या पश्चिमेस इराणी देवतांची उपासना सर्वत्र प्रचलित होती. तिसर्‍या शतकांत लॅटिन भाषा बोलणार्‍या सर्व रोमन प्रांतांत झरथुष्ट्र पंथाचा फार प्रसार झाला होता. या पारशी संप्रदायाचा कल नेहमीं निरनिराळे संप्रदाय एकत्र करण्याकडे होता. सांप्रदायिक कल्पनेच्या मानानें अहुरमझ्द ही वरिष्ठ देवता होती, परंतु व्यवहारांत त्याच्या ऐवजीं अन्य देवतांची पूजा लोक करीत व शुद्धाचरणाचे नियम पाळणारास मोक्षप्राप्ति होते असा लोकांचा विश्वास असे.
परंतु पर्सिसमध्यें मात्र इराणी संप्रदायावर बाह्य जगांतील गोष्टींचा कांहींएक संस्कार झाला नव्हता. अहुरमझ्द व अहरिमन यांमधील अथवा सद्गुणी देवदूत व दुष्ट दैत्य यांमधील वैर हेंच संप्रदायाचें मुख्य तत्त्व पर्सिसमध्यें मानलें जात असे, व इतर देवदूत व देवता व्यवहारांत कितीहि उपयुक्त असल्या तरी ते अहुरमझ्दरचे सेवक मानले जात असत. या देवतांचें उच्च मूर्त स्वरूप म्हणजे मिथ्र नांवाची सूर्यदेवता नसून धर्मोपदेशकांनीं रक्षण केलेला अग्नि हें होय. या देशांत शुद्धाचरणाचे सर्व नियम कडक रीतीनें पाळले जात असत; प्रेतांनां जमिनींत पुरीत नसून कुत्रीं व गिधाडे यांजकडून खाववीत असत. अहुरमझ्द ही राष्ट्रदेवता होती. ती घोड्यावर स्वार झालेली युद्धदेवता असून ती उपासकांनां विजय व जगाचें राज्य देते असा समज होता. झर्वन पंथाच्या अनुयायांनां नास्तिक समजत असत व खर्‍या धर्माच्या लोकांचें आदय कर्तव्य या नास्तिकांचा नाश करणें हें होतें. ॲकिमेनिड काळांत सर्वधर्मसहिष्णुता होती; आर्सेसिडी काळांत इतर धर्माकडे दुर्लक्ष केलें जात असे; परंतु सस्सन काळांत इराणी धर्माखेरीज इतर धर्मांचा छळ होऊं लागला. पहिला अर्देशिर हा असल्या प्रकारचीं मतें प्रचलित असतांना होऊन गेला. तिसर्‍या व्हिलोजिसीझनें सांप्रदायिक ग्रंथ गोळा करण्याचें काम सुरू केलें होतें तें अर्देशिरनें पुढें चालवून धर्माध्यक्ष जॅन्सरकडून सर्व पुराणधर्ममतें व लेख एकत्र करविले, व अन्यमतांच्या सर्व सांप्रदायिक पद्धति बेकायदेशीर ठरवून बंद करण्यांत आल्या. अशा रीतीनें पारशी लोकांचे अवेस्ता व वेंदिदाद हे धर्मग्रंथ अस्तित्वांत आले. देवतांच्या मूर्ती हें नास्तिकपणाचेंच लक्षण समजून सर्व देवळांतून काढून टाकण्यांत आल्या व त्यांच्या ऐवजीं स्थंडिलें बांधण्यांत आलीं. पहिल्या शापुरनें आपल्या सांप्रदायिक ग्रंथांत वैदयक, ज्योतिष, गणित, तत्त्वविवेचन, प्राणिशास्त्र इत्यादि शास्त्रीय विषयांवरील ग्रंथांचा देखील समावेश केला.