प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

वजीर वगैरे अधिकारी मडळा व दरबारा भाषा - राजाच्या दहा हजार शरीररक्षकांचा नायक हाच दरबार व साम्राज्याची राज्यव्यवस्था यावर देखरेख ठेवीत असे. या सरदाराचें काम अर्वाचीन वजिरासारखें असे. याला ग्रीक लोक 'चिलिआर्च' असें म्हणत. याशिवाय सात मंत्री असत. 'राजनेत्र' नामक अधिकार्‍याचा वारंवार उल्लेख येत असतो. याच्याकडे सर्व साम्राज्याचा ताबा व अधिकार्‍यांवरील देखरेख हीं कामें सोंपविलेलीं होतीं राजाचे सर्व हुकूम कीलाकृत लिपींत लिहिले जात. मूळ इराणी हुकुमाला सुसान व बाबिलोनी भाषांत केलेले तर्जुमे जोडीत असत. इजिप्‍तमध्यें याच्याच जोडीला चित्रलिपींतील व ग्रीक प्रांतांत ग्रीक लिपींतील आणखी एक तर्जुमा जोडण्यांत येत असे. ही लिपि दगड अथवा चिंकणमाती यांवरच लिहिली जात असे. राजकीय पत्रव्यवहारांत दगडमातीच्या ऐवजीं चर्मपत्राचा उपयोग करीत असत. परंतु चर्मपत्रावर कीलाकृति लिपि लिहितां येत नसे म्हणून त्यावर पर्शियन भाषा अरमइक लिपींत लिहिण्यांत येऊं लागली. या लेखनसाहित्यामुळेंच पह्लवी लिपि विकास पावली.

इराणी साम्राज्याच्या पश्चिम भागांत सर्वत्र पर्शियन भाषेबरोबरच बरेच दिवसांपासून व्यापारी वर्गांत रूढ असलेली अरमइक भाषा ही दुय्यम प्रतीची भाषा म्हणून प्रचारांत होती. या भागांतील महत्त्वाच्या अशा सर्व सरकारी कागदपत्रांतील मजकुराचे सरकारी रीत्या अरमइक भाषेंत भाषांतर देण्यांत येत असे, व क्षत्रपांनीं पाडलेल्या नाण्यांवरहि अरमइक लिपीचा लेख देण्याची वहिवाट होती. इजिप्‍तमध्यें फक्त खासगी पत्रव्यवहार तेवढा डेमोटिक भाषेंत होत असे. फक्त हेलेनिक प्रांतांत मात्र अरमइकबद्दल ग्रीक भाषा वापरीत असत.