प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

राजांची वसतिस्थानें - पासार्गाडी जिल्ह्यांत आपल्या मातृभूमीवर सायरसनें एक शहर वसवून तेथें एक राजवाडा व थडगें बांधलें. हें शहर हल्लीं जेथें मुर्घाबचे अवशेष सांपडतात तेथें होते. परंतु पुढें दरायसनें याच्या ऐवजीं देशाच्या मध्यभागीं एक नवीन राजधानीचें शहर वसविलें. याचें नांव ''पर्शियन'' (पेर्सा) असें होतें व यालाच पुढें ग्रीक लोक पर्सेपोलिस असें म्हणूं लागले. परंतु पर्सिस जिल्हा साम्राज्याच्या मध्यापासून इतका दूर होता कीं, तें राज्यकारभार चालविण्याचें मध्यवर्ती ठिकाण होणें शक्य नव्हतें. खरें मध्यवर्ती ठिकाण तैग्रिस व युफ्रेटीझ नद्यांमधील सुपीक प्रदेशांत असल्यामुळें राज्याची खरी राजधानी सुसा हीच होती, व तेथें पहिला दरायस व दुसरा आर्टाक्सर्क्सीझ यांनीं भव्य राजवाडे बांधले होते. हिंवाळ्यांत हे राजे बाबिलोनमध्यें रहात व उन्हाळ्यांत ते एकबटानाच्या दक्षिणेस एलव्हेंड पर्वतावर बांधलेल्या वाड्यांत रहावयास जात. पर्सिस किंवा पर्सेपोलिस येथें हे राजे क्वचित् प्रसंगीं-मुख्यत्वें करून राज्याभिषेकाच्या वेळींच-येत असत.