प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
मृत्यूसंबंधीं कथांमध्यें साम्य दाखविण्याचा प्रयत्न - ख्रिस्ताच्या मरणाची सुद्धां बुद्धाच्या निर्वाणप्रवेशाशीं तुलना केलेली आहे. सेडेलनें असें दाखविलें आहे कीं, दोन्ही गोष्टी घडल्या तेव्हां धरणीकंप झाला होता; आणि एडमंडसनें तर ख्रिस्त व बुद्ध दोघेहि उघड्या जागीं मरण पावले, या गोष्टीवर जोर दिला आहे. परंतु वस्तुतः दोन सांप्रदायिक कथांत इतका स्पष्ट फरक इतरत्र कोठेंहि आढळत नाहीं. महापरिनिब्बानसुत्त आणि सेंट मॅथ्यूचें २७ वें प्रकरण यांत केवढें अन्तर ! इकडे हा धर्मवेडेपणाला बळी पडणार्या आत्मयज्ञास तयार झालेल्या महात्म्यावरील हृदयद्रावक शोकप्रसंग आणि तिकडे तें महात्म्याचें शान्तपणें प्रयाण - उज्ज्वल व कष्टहीन मरण ! सेंट मॅथ्यूच्या शुभवर्तमानांत धरणी दुभंग होत व कंप पावते आणि थगडीं आ पसरतात. पण ते घडत असलेल्या गुन्ह्याच्या गंभीरतेमुळें. महापरिनिब्बानसुत्तामध्येंहि धरणी कंप पावते, पण तें बुद्धदेवाला पूर्ण निर्वाणप्राप्ति झाल्याबद्दल वाटत असलेल्या आनंदामुळें !