प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

अंकित राष्ट्रें - असुरी व रोमन लोकांच्या प्रमाणेंच पर्शियन लोकहि आपल्या लढायांत क्रूरपणा दाखवीत नसत. ते जिंकलेल्या लोकांचीं शहरें पाडून टाकित नसत. सायरसप्रमाणें त्याच्या मागून झालेलें राजेहि जित लोकांनां कारभारी, सेनानायक अशा महत्त्वाच्या नोकर्‍यांवर नेमीत असत व त्यांनां जमिनीहि नेमणूक करून देत असत. केवळ मीड लोकांनांच नव्हे तर आर्मीनियन, लीडियन, यहुदी व ग्रीक या सर्व लोकांनां अशाच रीतीनें वागविण्यांत येत असे. जित व जेते या दोनहि जातींच्या प्रजाजनांनां राजाची लष्करी नोकरी करावी लागत असे, व इराणी राजाच्या पदरीं इराणी लोकांप्रमाणेंच निरनिराळ्या जित लोकांचींहि पलटणें होतीं.

जित लोकांमध्यें मीड लोकांवर इराणी राजाची फार मर्जी असे. हे लोक इराणी लोकांपूर्वी राजसत्ताधीश असल्यामुळें जास्त सुधारलेले होते, व यांचे पोषाख व इतर चालीरीती पर्शियन लोकांनीं उचलल्या होत्या. येणेंप्रमाणें जातीजातींमधील भेदभाव नाहींसे करून सर्वांचें मिळून एकच इराणी राष्ट्र बनविण्यास सुरुवात झाली होती व हें काम सस्सन लोकांच्या कारकीर्दीत पूर्णावस्थेंत आलें.