प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

आर्सेसिडी राज्याचा उत्तरकालीन इतिहास - या परिस्थितीवरून असें दिसून येते कीं, पार्थियन राज्याची स्थापना जरी इतरांपासून काबीज केलेल्या प्रदेशांवर झाली होती; तरी दुसर्‍या मिथ्राडेटीझच्या काळानंतर या राज्यानें जोरदार लढाईचें धोरण केव्हांहि अंगीकारलें नाहीं. पश्चिमेस रोमन लोकांच्या व पूर्वेस सिथियन लोकांच्या स्वार्‍यांपासून या राज्याला नेहमीं संरक्षण करावें लागत असे. मेसापोटेमिया व त्यांतील अंकित संस्थानें, तसेंच अँट्रोपाटीन व आर्मिनिया यांवरील आपलें वर्चस्व राखणें अथवा पुन्हां मिळविणें हेंच या राज्याचें आदय कर्तव्य होऊन बसलें होतें. आपले हक्क मिळविण्याचा प्रयत्‍न करतांना जबरदस्त शत्रूची गांठ पडल्यास आर्सेसिडी राजे माघार घेत असत. यावरून त्यांचें दौर्बल्य चांगलेंच दिसून येतें.