प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
इराणचे पौराणिक राजे - इराणच्या इतिहासांतील पौराणिक काळ फारच प्राचीन असून त्याबद्दल माहिती फार त्रोटक मिळते. शिवाय संशोधनाच्या अपुरेपणामुळें पौराणिक गोष्टी म्हणजे सर्व काल्पनिक कथा असा समज फार दिवस रूढ होता. तथापि प्राचीन हिंदुस्थान, असुरिया, बाबिलोनिया, ईजिप्त इत्यादि राष्ट्रांचा प्राचीनतर इतिहास उपलब्ध होत जाऊन एकमेकांच्या पौराणिक उर्फ काल्पनिक म्हणून गणल्या जाणार्या गोष्टींनां प्रत्यंतर पुरावा मिळूं लागल्यामुळें त्यांनां ऐतिहासिक सत्याचें स्वरूप हळू हळू प्राप्त होऊं लागलें आहे.
इराणमधील पौराणिक कथा फार रम्य असून त्यांवरून सायरस व क्सक्सींझ यांचे इराणी राष्ट्र फार प्राचीन काळापासून सतत सारख्या जोमदार स्थितींत होतें असें दिसतें. म्हणून या पौराणिक राजांची यादी व तत्कालीन राजकीय घडामोडींची जंत्री येथें देतों.
कैओमूर्स - हा इराणी राष्ट्राचा आद्य संस्थापक होय. याला गिलशहा उर्फ जगाचा राजा अशी पदवी होती. त्यानें आपली राजधानी बल्ख येथें स्थापली. त्यानें आसपासच्या रानटी जातींनीं सुधारण्याचा फार प्रयत्न केला. त्यांत दीवे नामक रानटी लोकांनीं त्याला विरोध केला व उभय पक्षांत झालेल्या लढाईंत कैओमूर्सचा मुलगा सायमेक मारला गेला; तथापि सायमेकचा मुलगा हौषेंग यानें अखेर दीवेंचा पराभव केला. नंतर लवकरच कैओमूर्स मरण पावून त्याचा नातू हौषेंग राजा झाला. याच्याच कारकीर्दीत इराणी लोकांनीं अग्निपूजा स्वीकारली. होषेंगनंतर थमौरस राजा झाला, पण त्याबद्दल विशेष कथा नाहीं.
शहा जमशीद - थमौरसनंतरचा हा इराणी राजा बराच प्रसिद्ध आहे. यानें पुष्कळ वर्षे राज्य करून लोकांची फार सुधारणा केली. त्यानें इराणी लोकांचे धर्मोपदेशक, योद्धे, व्यापारी व शेतकरी असे चार वर्ग करून त्यांचे धंदे पृथक् ठरविले. यांपैकीं शेवटचा शेतकरी वर्ग नेसौडी या नांवानें प्रसिद्ध होता. या राजानें लोखंड, धातूच्या वस्तू, लोंकर, रेशीम व कापसाचें विणकाम व वेलवुट्टीकाम, इमारती बांधण्याकडे विटांचा व संगमरवरी दगडांचा उपयोग, जहाजें बांधण्याची कला, वैद्यकीचें ज्ञान, सुगंधी पदार्थांचा धंदा, वगैरे अनेक गोष्टींनां सुरुवात करून उत्तेजन दिलें; त्यानें नोरूझ म्हणजे नवें वर्ष म्हणून नवीन वर्षगणनापद्धति सुरू करून त्या वेळी दहा दिवसांचा उत्सव करण्यास सुरुवात केली. अशा रीतीनें अनेक कृत्यें करून त्यानें बरीच कीर्ति मिळविली; पण याचा परिणाम असा झाला कीं, पुढें तो मोठा गर्विष्ठ व उद्दाम बनला, व लोकांवर जुलूम करूं लागला. यामुळें प्रजेमध्यें असंतोष माजून बंड झालें व शेजारच्या राष्ट्राचा झोहॉक नामक राजा होता त्यानें प्रजापक्षाला मदत करून जमशीदचा लढाईंत पराभव केला, व इराणचें राज्य घेतलें. तेव्हां जमशीद पळून जाऊन कांहीं वर्षे लपून राहिला आणि पुन्हा परत येऊन त्यानें राज्य घेण्याचा प्रयत्न केला. पण झोहॉकनें त्याला पकडून त्याची कत्तल केली व अशा रीतीनें जमशीदचा दुःखकारक शेवट झाला. तथापि पूर्वकारकीर्दीतील सत्कृत्यामुळें त्याला अद्याप लोक फार मान देतात.
झोहॉक - या परकी राजानें इराणी प्रजेवर फार जुलूम केले. अखेर शहा जमशीद याचा नातू जो आबतिन त्याचा मुलगा फेरिदून यानें त्याचा पराभव करून त्याला एका दरीच्या तोंडाशीं खडकास घट्ट बांधून तेथें त्याला कायमच्या आरोळ्या मारीत ठेवलें. झोहॉक हा दुष्ट स्वभावाचा होता. याविषयीं त्याच्या पूर्व व उत्तर चरित्रातील अनेक दंतकथा आहेत. त्यानें भारतीय पुराणांतील कंसाप्रमाणें बापाला ठार मारून राज्य बळकावलें व पुढें इराणचा राजा झाल्यावर आपल्या भावी शत्रु फेरिदून हा जन्मल्याचें कळल्यापासून त्याला ठार मारण्याचे अनेक प्रयत्न केले, वगैरे कथा आहेत. तसेंच कवेह नांवाच्या एका लोहाराचे १६ मुलगे मारले गेल्यामुळें फेरिदूनला झोहॉकविरुद्ध लढाईंत लोकांची मदत मिळाल्याची कथा आहे. या कवेहनें आपल्या अंगावरचें कातड्याचें वस्त्रच बंडाचें निशाण म्हणून उभारलें होतें. पुढें या वस्त्रालाच सोनेरी नकशी व हिरेंमाणमें लावून तें इराणचें राष्ट्रीय निशाण म्हणून मुसुलमानांच्या अंमलापर्यंत चालें होतें. परंतु यांपैकीं कित्येक कथा कल्पित असून त्या वेळीं इराणावर झालेल्या असुरी लोकांच्या स्वारीवर उभारलेलें तें एक रूपक आहे, असें अलीकडील ऐतिहासिक संशोधकांचें म्हणणें आहे.
फेरिदून - यानें पुष्कळ वर्षे राज्य केलें, व त्या काळांत त्याची प्रजा फार सुखी होऊन भरभराटीस चढली. त्यानें आपल्या मुलांचीं लग्नें येमेनच्या (अरबस्थानांतील भाग) सेर्व्ह नांवाच्या राजाच्या मुलींशीं लावलीं. याबद्दलच्या मोठाल्या कथा आहेत. उत्तर व यांत फेरिदूननें आपलें राज्य या मुलांत वांटून दिलें. सर्वांत धाकट्या आवडत्या इरेद्ज नांवाच्या मुलाला त्यानें खुद्द इराण देशाचा राजा केलें, व तूर नांवाच्या मुलाला चीनच्या बाजूकडील मुलूख दिला. हा देश तेव्हांपासून पुष्कळ शतकें तुराण देश या नांवानें प्रसिद्ध होता. परंतु ही वांटणी थोरल्या तूर व सेल्म या दोघांस पसंत न पडून त्यांनीं युक्तीनें धाकट्या भावाला आपल्या राज्यांत बोलावून तेथें त्याला मारलें. तेव्हां त्याबद्दल सूड उगविण्यासाठीं वृद्ध फेरिदूननें इरिदेजचा मुलगा मिनौश्चेहर याच्याबरोबर सैन्य पाठवून लढाई केली. तींत मिनौश्चेहरचा जय होऊन तूर व सेल्म मारले गेले.
मिनौश्चेहर - वरील विजयानंतर लवकरच फेरिदून मरण पावला व त्याचा नातू मिनौश्चेहर गादीवर आला. यानें न्यायानें व दयाळूपणानें राज्य केलें. त्याला इराणमधील सीस्तान नामक प्रांताचा नेरिमनचा पुत्र साहम नांवाचा अधिकारी फार विश्वासू व पराक्रमी होता. त्याच्या झाल नांवाच्या पुत्रासंबंधानें एक मोठी कथा आहे. या कथेपैकीं महत्त्वाचा राजकीय भाग एवढाच आहे कीं, झाल वयांत आल्यावर त्याचे काबूलचा राजा मिहरब याच्या रूदाबेह नांवाच्या कन्येवर प्रेम बसून तिच्याशीं लग्न करण्याचें त्याच्या मनांत आलें. पण काबूलचा राजा हा इराणचा पूर्वीचा शत्रु झोहॉक याच्या वंशांतील असल्यामुळें झालच्या बापाला व खुद्द मिनौश्चेहरला हा शरीरसंबंध अनिष्ट वाटत होता. तथापि झालचें उत्कट प्रेम व अतुल पराक्रम याबद्दल मिनौश्चेहरनें स्वतःची खात्री करून घेऊन विवाहास आपली संमति दिली. पुढें या दंपत्यापासून इराणच्या पौराणिक कथांतील रुस्तुम हा सुप्रसिद्ध पुरुष जन्मास आला. हा रुस्तुम व त्याचा मुलगा सोराब यांच्या संबंधाच्या इराणी पौराणिक कथेच्या आधारें आर्नोल्ड नामक इंग्रज कवीनें आपलें 'सोराब व रुस्तुम' हें सुप्रसिद्ध काव्य रचले आहे.
न्यूदेर, झेफ, गूरशापं व कैकोबाद - मिनौश्चेहर मरण पावल्यानंतर त्याचा मुलगा न्यूदेर राज्य करूं लागला. पण तो अन्यायी व जुलमी असल्यामुळें त्याच्या सरदारांनीं बंड केलें. या सुमारास तूराणवर तूरच्या वंशांतील आफ्रासिआब नांवाचा राजा राज्य करीत होता. त्यानें इराणबरोबर अनेक युध्दें केलीं. त्यांत सोहम, झाल व रुस्तुम यांनीं इराणतर्फे लढून मोठ्या पराक्रमानें राज्याचें संरक्षण केलें. पण न्यूदेरच्या कारकीर्दीतील बंडाची संधि साधून आफ्रासिआबनें पुन्हां इराणवर स्वारी केली व न्यूदेरचा लढाईंत पराभव करून त्याला ठार मारलें. तथापि या वेळींहि झालनें फेरिदूनच्या कुळांतला एक दूरचा नातलग झेफ नांवाचा गादीवर बसवून आफ्रासिआबला हांकून लावलें. झेफ पांच वर्षे राज्य करून मरण पावला व गूरशाप नांवाचा राजा गादीवर आला. त्या वेळीं तुराणच्या तुर्क लोकांनीं पुन्हां इराणवर स्वारी केली, पण रुस्तुमनें मोठ्या शौर्यानें आफ्रासिआबला तोंड दिलें. याच धामधुमींत गूरशाप राजा निपुत्रिक मरण पावला. पुन्हां रुस्तुमनें जुन्या व पूज्य फेरिदूनच्या घराण्यांतला कैकोबाद नांवाचा पुरुष राज्यावर बसविला, व स्वतः अचाट पराक्रम गाजवून आफ्रासिआबचा पूर्ण मोड केला. या विजयानंतर कैकोबाद लवकरच मरण पावला.
कैकऊस - कैकोबादनंतर कैकऊस राज्यावर आला. त्यानें पुष्कळ वर्षे राज्य केलें. तो दुर्बल व लहरी असल्यामुळें राज्यानें रक्षण करण्यास रुस्तुम व इतर प्रमुख सरदार नसते तर इराणच्या साम्राज्यावर कांहींतरी संकट खास ओढवलें असतें. कैकऊसनें आरंभींच माझानदरान उर्फ हर्केनिआ या डोंगरी भागांतील दीवे नामक लढवय्या लोकांशीं युद्ध सुरू केलें. या लोकांनां जिंकण्याचा प्रयत्न शहा जमशीदपासून अनेक इराणी राजांनीं केला होता पण तो सफल झाला नव्हता. असा अनुभव असूनहि कैकऊसनें त्यांच्यावर स्वारी केली. या स्वारींत तो शत्रूकडून चोहोंबाजूंनीं वेढला गेला असतां झाल व रुस्तुम यांनीं आपल्या सैन्यानिशीं शत्रूशीं मोठी निकराची लढाई करून राजाला सोडविलें. या प्रसंगीं केलेल्या पराक्रमांविषयीं रुस्तुमचीं सात धाडशीं कृत्यें म्हणून पौराणिक कथा आहे. उपर्युक्त दीवे नांवाच्या जातीसंबंधानें अनेक इराणी पौराणिक कथांत वर्णन आहे. हे लोक शुक्लभास्वर वर्णी, स्वभावानें क्रूर व मोठे पराक्रमी असल्याचें वर्णन आहे.
वरील विजयाबद्दल आनंदोत्सव चालू असतां कैकऊसच्या साम्राज्यांतील सिरिया या भूमध्यसमुद्रकांठच्या प्रांतांतील लोकांनीं बंड करून स्वातंत्र्य पुकारलें. कैकऊसनें लागलीच मोठ्या सैन्यानिशीं या लोकांवर स्वारी करून त्यांचें बंड मोडलें, व सिरियाच्या राजाची मुलगी सौदाबेह हिच्याशीं तिच्या बापाच्या मर्जीविरुद्ध विवाह केला. त्याचा सूड म्हणून एका मेजवानीच्या प्रसंगीं सिरियाच्या राजानें कैकऊसला कैद करून एका मजबूत किल्ल्यांत अंधार्या भुयारांत टाकलें व शिवाय इकडे सैन्यानिशीं इराणवर स्वारी केली. याच वेळीं दुसर्या बाजूनें इराणचा दुसरा शत्रु तुराणचा राजा आफ्रासिआब यानें इराणवर स्वारी केली व सिरियाच्या सैन्याचा पराभव करून इराण जिंकून घेतला.
अशा भयंकर संकटांतून राष्ट्राला व राजाला सोडविण्याची अत्यंत अवघड कामगिरी सीस्तानच्या शूर व थोर घराण्यांतील सुप्रसिद्ध पुरुष झाल व रुस्तुम यांनींच केली. प्रथम रुस्तुमनें मोठ्या सैन्यानिशीं सिरियावर चाल करून कैकऊसला सोडविलें व सिरियाच्या राजाच्या मदतीनें तुराणच्या आफ्रासिआब राजाचा पराभव करून व त्याच्या सैन्याची मोठी कत्तल करून त्यास इराणांतून हांकून लावलें. याप्रमाणें रुस्तुमनें राष्ट्राला आपत्तींतून सोडवून कैकऊसला पुन्हां राज्य मिळवून दिलें.
या सुप्रसिद्ध रुस्तुमचें लग्न इराणच्या साम्राज्यांतील सेमेंजान नामक प्रांताच्या मांडलिक राजाच्या तेहमिमेह नांवाच्या सुंदर कन्येशीं झालें होतें. त्यांनां सोराब नांवाचा मुलगा झाला. तोहि बापाप्रमाणें मोठा पराक्रमी होता. या बापलेकांसंबंधानें उपर्युक्त 'सोराब व रुस्तुम' नामक काव्यांत मोठी हृदयद्रावक गोष्ट दिली आहे.
कैकऊसला अनेक बायका होत्या, त्यांत फेरिदूनच्या वंशांतील एक स्त्री होती. तिला सिआवुश नांवाचा फार बुद्धिमान् व गुणवान् पुत्र होता. सिरियाच्या राजघराण्यांतील कैकऊसची सौदाबेह नांवाची जी राणी होती तिनें पातिव्रत्यपराङमुख होऊन सिआवुशजवळ प्रेमयाचना सुरू केली; पण त्या शीलवान् पुत्रानें तिचा धिःकार केला. तेव्हां तिनें त्याच्यावरच उलट कुभांडखोरपणानें नीचपणाचा आरोप करून राजाला ती गोष्ट कळविली. राजानें ज्योतिष्यांच्या सल्ल्यावरून पुत्राला अग्निदिव्य करावयास लाविलें. परंतु परमेश्वरकृपेनें सिआवुश त्यांतुन निर्दोष बाहेर पडला, व त्यानें आपल्या सापत्न मातेला क्षमा करण्याविषयीं बापास आग्रह केला. हें संकट टळलें नाहीं तोंच सौदाबेह राणीनें सावत्र पुत्रावर दुसरें संकट आणलें. याच सुमारास तुराणच्या आफ्रासिआबची देशावर पुन्हां स्वारी होऊन रुस्तुम व सिआवुश यांनीं त्याचा पराभव करून त्याशीं तह केला होता. पण त्या तहाच्या अटी राणीच्या चिथावणीवरून कैकऊसनें अमान्य करून आफ्रासिआबला न मारल्याबद्दल तुराण देश न जिंकल्याबद्दल सिआवुशला दोष दिला; व तहामुळें ओलीस आलेल्या इसमांस ठार मारण्याचें ठरविलें. पण सिआवुशला असा विश्वासघात करणें मान्य नसल्यामुळें त्यानें ओलीस इसम परत पाठवले; व स्वतः देशत्याग करून आफ्रासिआबच्याच आश्रयास जाऊन राहिला. आफ्रासिआबनें त्याचा उत्तम सन्मान करून त्यास आपली फेरेग्विझ नांवाची मुलगी दिली व एका मोठ्या प्रांतावर अधिकारी नेमलें. पण आफ्रासिआबचा भाऊ ग्वेर्सिवेझ यानें सिआवुश तुराणवर इराणची स्वारी आणण्याच्या खटपटींत आहे असें आफ्रासिआबच्या मनांत भरविल्यामुळें आफ्रासिआबनें रागानें सिआवुशला ठार मारलें व आपल्या गर्भवती मुलीसहि भुयारांस अटकेंत ठेविलें. अशा स्थितींत पिरनविसा नांवाच्या वृद्ध मंत्र्यानें आफ्रासिआबचें मन वळवून त्याच्या नातवाला वांचविले. पुढें मुलाची ही हकीकत कळतांच कैकऊसनें रुस्तुमला आफ्रासिआबवर पाठविलें. त्यानें आफ्रासिआबचा पराभव करून व त्याला दूर चीनमध्यें हांकून देऊन सिआवुशच्या मुलाला, म्हणजे कैकऊसच्या नातवाला, परत आणलें. हाच इराणचा सुप्रसिध्द कै खुशरू उर्फ सायरस राजा होय. व येथून इराणच्या ऐतिहासिक काळाला आरंभ होतो.
इराणसंबंधानें सायरसच्या पूर्वीच्या काळांतली वर दिलेली जी थोडी माहिती आपणांस निव्वळ ऐतिहासिक पुराव्यानें उपलब्ध होते त्या माहितीची आणि पौराणिक स्वरूपी इतिहासाची संगति लावली गेली नाहीं.
इराणच्या बर्याच भागांत इंडोयूरोपीय वंशांतील लोकांची वस्ती, आपणांस जेव्हांपासून इतिहासाचे धागे कांहींतरी लागतात तेव्हांपासून होती, असें आपणांस आढळून येतें. हे लोक आपणांस ''आर्य'' म्हणवीत असत अशी एरिआना वगैरे शब्दांवरून कल्पना करण्यांत आली आहे. यांची भाषा ''आर्यन'' वर्गांतील असे. सर्व देशाला ॲरिअन (झेंद-ऐर्यन) म्हणजे आर्यांचा देश हें मध्यइराणी एरानचें व अर्वाचीन इराणचें मूलरूप असलेलें नांव होतें. आजच्या ''अझर बैजन'' या लोकसत्ताक संस्थाननामाचा संबंध आर्य शब्दाशींच आहे.