प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

इराणमधील इतर जाती - पूर्वी इराणी लोकांशिवाय परकी वंशांतील असंख्य जाती इराण देशांत वास्तव्य करून होत्या. बलुचिस्थानांतील ब्राहुइ लोकांचा हिंदुस्थानांतील द्राविडी भाषा बोलणार्‍या लोकांशीं एकवंशसंबंध आहे. या जिल्ह्यांतील पर्शूंच्या अगोदरचे रहिवाशी व येथें पुरातन काळीं ज्यांनीं वसाहत केली ते लोक यांचा संबंध या द्राविड लोकांतच शोधून काढतां येईल अशी कित्येकांची कल्पना आहे. असुर देशांतील प्राचीन लोक सुमेरिअन हे द्राविड वंशांतील लोक, इराणांतील प्राचीन लोक हेहि द्राविड वंशांतले अशी परिस्थिति असल्यास द्राविडी वंशांचा वेदपूर्व प्राचीन काळीं मोठा प्रसार होता असें होईल. पॅरिकानी, जिड्रोसी व मिसि (यांनां कधीं कधीं 'इथिओपिअन' म्हणतात). हे लोक या प्राचीन जातींपैकींच आहेत. मीडियामध्यें अनारिआकी (म्हणजे अलीकडील ''संशोधकांच्या'' बेसावध मताप्रमाणें 'अनार्यन्') लोक रहात होते असें ग्रीक भूगोलकार म्हणतात. यांचपैकीं, टापुरी, आमाडीं, कास्पी व काडुसी लोक होत. झॅग्रोस पर्वतांत बाबिलोनी व असुरी सत्तेच्या काळांत इराणी लोकांचा अवशेष आढळत नाहीं, परंतु गुटीअन, लुलुबीअन वगैरे सेमेटिक लोक व कोसीइ आणि एलीमीअन (एलमाइट?) लोक आढळतात.