प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
इराणी लोकांच्या जाती - इराणच्या आर्यन् भाषा बोलणार्या लोकांच्या असंख्य जाती आहेत. दरायसच्या शिलालेखांच्या आधाराप्रमाणें मुख्य जाती पुढें दिल्याप्रमाणें आहेत :-
१. वायव्येकडील मीड नामक लोक. त्यांपैकीं कांहींचा उल्लेख अवेस्तांत आढळतो (मओघि = मग).
२. दक्षिणेंतील पर्शियन (पर्श) लोक.
३. कास्पियन समुद्राच्या पूर्व कोपर्यातील आस्ट्राबाद जिल्ह्यांतील हिर्कानियन लोक.
४. खोरासनमधील पार्थियन लोक.
५. आरियस (हेरी-रुड) नदीजवळील आरियन (आर्यन) लोक.
६. वायव्य अफगाणिस्थानांतील ड्रान्गियन लोक.
७. कंदाहार भोवतालच्या हेलमंड नदीप्रदेशांतील आराकोशिअन लोक.
८. हिंदूकुश पर्वताच्या उत्तर बाजूचे बॅक्ट्रियन लोक. यांची राजधानी बॅक्ट्रा अर्वाचीन बल्ख होती.
९. ऑक्सस व झक्झार्टिस नद्यांमधील डोंगराळ प्रदेशांतील सोग्डियन लोक.
१०. खिव देशांतील खोरॅस्मियन लोक.
११. मार्गस (मुर्धाव) नदीवरील मार्गियन लोक.
१२. सागर्टियन लोक - इराणी भाषा बोलणार्या फिरत्या घोडेस्वार लोकांची एक जात.
१३. तुर्कस्थानच्या पठारांवरील तुराण व तुराणी लोक.
१४. याशिवाय लुरी वगैरे हिंदुस्थानी लोकांशी अधिक सदृश लोकांचाहि उल्लेख केला पाहिजे.
इराणी व हिंदू या लोकांमधील विभाजक रेषा हिंदूकुश व सुलेमान पर्वत हे होत. इराणी लोकांच्या शेजारीं शक नांवाच्या लढाऊ घोडे स्वार लोकांची पामीर डोंगरपठारांत रहाणारी जात होती. तिचा संबंध प्राचीन हिंदुस्थान व प्राचीन इराण यांच्या इतिहासाशीं बराच आलेला आहे.