प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

उपासना व परमार्थसाधनांतील साम्य व भेद - प्राचीन बौद्धिक चलवलन अवगमिण्यासाठीं आपणांस सर्व राष्ट्रांच्या प्राचीनतम ज्ञात स्थितीकडे अवलोकिलें पाहिजे. भारतीयांमध्यें व इराणी लोकांत जो अथर्व्यांचा सामान्य धर्म होता त्याच्या निरनिराळ्या छटा आपणांस केल्टिक लोकांपासून ग्रीक लोकांपर्यंत पसरलेल्या लोकसमूहांच्या पौरोहित्यांत दिसून येतात. प्रत्येक राष्ट्रांत अथर्व्यांशीं सदृश वर्ग, ज्योतिष, बलि, जादूटोणे व वैद्यक यांत गुंतलेला आढळेल. हें सामान्यत्व होतेंच. अनेक देवतांचें प्राचीन एकत्व या सुमाराच्या काळास जरा बदलल्यासारखें दिसत होतें. परंतु एका समुच्चयास दुसर्‍या समुच्चयाचीं दैवतें अमान्य होतीं असें मात्र नाहीं. ग्रीकांचा अस्मोडिअस पर्शूंत अश्मदेव या नांवानें होता. परंतु त्याची सदृश शब्दांची प्रतिकृति भारतांत दिसत नाहीं. ॠग्वेदांतील अनेक देवतांपैकीं ज्या अन्यत्र सांपडल्या आहेत अशा देवता फारच थोड्या. जसें देवतांचें आहे तसेंच विधीचेंहि आहे. भारतांतील श्रौतधर्म मंत्रकालीन श्रौतधर्मापेक्षां अगदींच निराळा झालेला होता. त्याप्रमाणें निरनिराळ्या राष्ट्रांमध्यें पितृमूलक अग्न्युपासनेंत किंवा अग्निद्वारा दैवतोपासनेंत फरक पडलेला होता. पर्शूंच्या किंवा मगांच्या प्राचीन श्रौत धर्माचें आपणांस शिस्तवार ज्ञान मुळींच नाहीं. पर्शूंचा धर्म आणि भारतीयांचा धर्म यांतील सध्यांच्या किंवा कांहीं वर्षांपूर्वीच्या अग्निकर्मविधींचें ज्ञान गोळा करून डॉ. जीवनजी मोदी यांनीं नुकतेंच मुंबईच्या अन्थ्रापॉलॉजिकल सोसायटीपुढें मांडलें व तें त्या संस्थेच्या अहवालांत प्रसिद्धहि केलें आहे. त्यांनीं जी माहिती दिली आहे ती जवळ जवळ लुप्‍त विधींचीच दिली आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. आणि त्यावरून आपणांस अत्यन्त प्राचीन कालचा पारशांचा श्रौतस्मार्त - धर्म काढावयाचा असला तर बरेंच कल्पनेंत शिरावें लागेल. त्या कल्पनेमध्यें सध्यां शिरण्याचें प्रयोजन नाहीं. तथापि एवढें निश्चितपणें म्हणतां येईल कीं, या विधिसमुच्चयांत अत्यंत प्राचीन काळच्या धर्मांचा म्हणजे रिवाजांचा अंतर्भाव झाला असावा. आणि झरथुष्ट्रेतर किंवा झरथुष्ट्रपूर्व जो मग-धर्म त्याचा हा रूपांतरित स्मारक असावा. झरथुष्ट्राला केवळ अवदानांची फिकीर नव्हती. त्यानें दैवतांस विशिष्ट गुणाचें स्वरूप देऊन ईश्वरसाहाय्यक बनविलें आहे; आणि एक प्रकारचा नैतिक विचारसमुच्चय पुढें मांडून जुनाट धर्मावर कडी करण्याचा प्रयत्‍न केला आहे. म्हणजे विचार आणि नैतिक बुद्धि यांचें ज्ञानकांड तयार करून त्याखालीं कर्मकांड चिरडण्याचा आरण्यकीय प्रयत्‍न झरथुष्ट्रानें केला. तात्पर्य, झरथुष्ट्राचें आपल्या प्रदेशांतील कार्य हें वासुदेव, महावीर, गौतम, चार्वाक, व आरण्यक धर्माचे अनेक प्रणेते यांच्या कार्याशीं सदृश आहे.