प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

ख्रिस्ती व मणि संप्रदायाशीं संबंध -   तैग्रिस व युफ्रेटीझ या नद्यांच्या प्रदेशांत अरमइक ख्रिस्ती संप्रदायाचा सर्वत्र जबर पगडा बसला होता. आपलाच काय तो खरा संप्रदाय असून इतर झूट आहेत व ते नाहींसे केले पाहिजेत हें तत्त्व ख्रिस्ती संप्रदायांत मुख्य होतें. या ख्रिस्ती संप्रदायाचें प्रसारक सर्व इराणभर पसरले होते. यामुळें ख्रिस्ती संप्रदाय व इराणी संप्रदाय हे परस्पर हाडवैरी बनले. प्रत्येक संप्रदायांत सत्यांश आहे व हा सत्यांश एका संप्रदायांतून घेऊन दुसर्‍यांत संलग्न करतां येतो ही जुनी कल्पना अद्याप प्रचलित होती, व याच तत्त्वाच्या आधारावर वर वर्णन केलेला मणी नामक पंथ अस्तित्वांत आला. या पंथाचा उपदेशक मणी नांवाचा इराणी मनुष्य होता. ख्रिस्ती संप्रदायाचा शुभवर्तमान ग्रंथ व झरथुष्ट्राचीं धर्मतत्त्वें एकत्र करून एक पंथ काढावा असा मणीचा प्रयत्‍न होता. मणी हा प्रथम पहिल्या शापुरच्या राज्यारोहणाच्या दिवशीं शिक्षक म्हणून बाबिलोनियांतून आला. दरबारांत व राज्यांतील इतर भागांत त्याचे बरेच लोक अनुयायी झाले. परंतु शापुरचा मुलगा पहिला बहराम (२७३-२७६) यानें इराणी उपासकांच्या आग्रहानें मणीस देहांत शिक्षा दिली. सस्सन राज्यांत मणिपंथाचा छळ होऊं लागला, तरी सस्सन राज्याच्या हद्दीबाहेर बाबिलोन, रोमन राज्य, खोरासान, मध्य आशिया, वगैरे देशांत हा पंथ प्रचलित होता. समरकंद हें या पंथाचें मुख्य ठाणें होतें. मणी व त्याचें शिष्य यांनीं इराणी भाषेंत सिरियन लिपीत व सॉग्डिएना भाषेंत लिहिलेल्या संप्रदायग्रंथांचे अवशेष भाग आहेत. या ग्रंथांत विश्वाच्या पित्याचें झरथुष्ट्र पंथाच्या इर्व्हनशीं व भूताचें अहरिमनशीं तादात्म्य दाखविलें आहे.

 सस्सन राजांची यादी.
 आर्देशिर पहिला  इ. स.  २२६-२४१
 शापुर पहिला  इ. स. २४१-२७२
 होर्मिझ्द पहिला  इ. स. २७२-२७३
 बहराम पहिला  इ. स. २७३-२७६
 बहराम दुसरा  इ. स. २७६-२९३
 बहराम तिसरा  इ. स. २९३
 नार्सेह   इ. स. २९३-३०२
 होर्मिझ्द दुसरा  इ. स. ३०२-२१०
 शापुर दुसरा   इ. स. ३१०-३७९
 अर्देशिर दुसरा  इ. स. ३७९-३८३
 शापुर तिसरा     इ. स. ३८३-३८८
 बहराम चौथा  इ. स. ३८८-३९९
 येझ्देगर्द पहिला  इ. स. ३९९-४२०
 बहराम पांचवा-गोर  इ. स. ४२०-४३८
 येझ्देगर्द दुसरा  इ. स. ४३८-४५७
 होर्मिझ्द तिसरा   इ. स. ४५७-४५९
 पेरोझ  इ. स. ४५७-४८४
 बालाश  इ. स. ४८४-४८८
 कवध पहिला   इ. स. ४८८-५३१
 जमास्प  इ. स. ४९६-४९८
 खुशरू पहिला अनुशिवान  इ. स. ५३१-५७९
 होर्मिझ्द चौथा  इ. स. ५७९-५९०
 खुशरू पर्वेझ दुसरा  इ. स. ५९०-६२८
 बहराम सहावा कोबिन, बिस्तम  इ. स. ५९०-५९६
 कवध दुसरा शेरो   इ. स.  ६२८.
 अर्देशिर तिसरा   इ. स.  ६२८-६३०
 शहारबरीझ  इ. स.  ६३०
  बोरन व इतर, ६३०-६३२) येझ्देगर्द तिसरा ६३२-६५१.