प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
झरथुष्ट्री संप्रदाय व प्राचीन धर्मांत सुधारणा - गाथा व तत्संबंधीचे ग्रंथ यांमध्यें जे धर्माचें स्वरूप आपणांस दिसतें तशा स्वरूपांतच तो धर्म निर्माण होऊन विकास पावलेला नाहीं. तर तो वास्तविक मूळच्या धर्माच्या स्वरूपांत मुद्दाम सुधारणा घडवून आणून बनलेला आहे. तथापि या धर्मांचीं मुळें पुरातन काळचीं नाहींत असें नाहीं. तर या धर्मांत कांहीं विचार अगदीं पुरातन काळपासून प्रचलित असलेल्या धार्मिक कल्पनांपासून घेतलेले दिसतात. ज्या कल्पनेवर त्या धर्मांतील मुख्य द्विशक्तिमत बसविलें आहे ती प्रधान कल्पना देखील साधूंची शक्ति व दुष्टांची शक्ति यांच्या मधील चिरंतन विरोध, सुपीकपणा व रुक्षपणा, प्रकाश व अंधकार आणि जीव व मृत्यु यांच्यामधील लढाया यांविषयीं पर्शुभारतीय कालीन जुन्या कथांवर रचलेली आहे. झरथुष्ट्री धर्म हा पारशी मंडळींचा राष्ट्रीय धर्म नसून हा राष्ट्रांतर्गत किंवा राष्ट्रधर्मांतर्गत संप्रदाय आहे. यासंबंधीं गाथांच्या प्रत्येक अकलुषित मनाच्या वाचकास पुरावे शोधून काढण्यास फार दूर जावयास नको. गाथांमधील मझ्द अहुर पुरातन आर्यन् लोकांच्या प्रकाशदेवतेहून जितका भिन्न आहे त्याहून मॉशेचा याहवे अरण्यांत गडगडणार्या आकाशस्थ देवतेहून जास्त भिन्न नाहीं. सर्व आर्यन् रूपकात्मक कथा व कल्पना गाथांमध्यें घेतलेल्या नाहींत. मिथ्र इत्यादि बहुतेक सर्व पुराणदेवतांविषयीं गाथांमध्यें कांहींच उल्लेख आढळत नाहीं. परंतु त्या काळीं या सर्व देवतांची विस्मृति झाली होती असें मात्र म्हणतां येत नाहीं. इराणांमध्यें त्यांचें बरेच भक्त होते. या देवता इतक्या अनेक व मान्य होत्या कीं. पुढील धर्मप्रवर्तकांस त्यांची प्राचीन पूजार्ह विभूतींमध्यें गणना करावी लागली. मिथ्रला मझ्दच्या बाजूनें दुय्यम स्थान द्यावें लागलें. हिंदू लोकांमध्येंहि वरुणाची साहाय्यक अशी ही एक दुय्यम देवता होती. गाथांमध्यें वीरांचा मुळींच उल्लेख केलेला नाहीं, यांपैकीं कित्येकांनां झरथुष्ट्र संप्रदायांत यझत (वैदिक यजत्र) म्हणून स्थापन करावें लागलें. तथापि यिम हा या स्थानभ्रष्टतेच्या प्रकारांत अपवाद आहे. हा वेदांतील यम होय. परंतु गाथांमध्यें यास प्राचीन काळचा साधु म्हणून स्थान मिळतें, व अशा रीतीनें हा मझ्दपूजकांस पूजार्ह बनला आहे. स्वर्गांतील जुन्या रहिवाशांची जागा मझ्द अहुर व त्याचे सहा अहुर सोबती यांनीं आतां घेतली आहे. हेच अमेशस्पेन्त होत. आज्ञाधारकपणा व स्पष्टीकरण यांची देवता श्रौष हिची जोड यांच्या बरोबरच केली आहे.
आरमैति हीहि अपवाद आहे. परंतु हिला पूर्वेकडील आर्यन् लोकांच्या काळांत दोन प्रकारचें महत्त्व होतें, व एका लक्षणानें ही झरथुष्ट्री देवता झाली. वीरांची जागा स्वतः झरथुष्ट्र व त्याचे नातलग आणि स्नेही यांनीं घेतली. झरथुष्ट्रानें पूर्वीच्या लौकिक राष्ट्रीय धर्मांतील दैवतपरंपरा जशीची तशीच मान्य केली असती तर प्राचीन धर्मांतील वीर व देवता आपणांस थोड्याशा बदललेल्या व सुधारलेल्या स्वरूपांत झरथुष्ट्री संप्रदायांत दृष्टीस पडल्या असत्या.
झरथुष्ट्राच्या सुधारणाकार्याविषयीं इतकें जोरदार वर्णन आहे कीं, हओम विधीविषयीं गाथांमध्यें मुळींच उल्लेख नाहीं. हओमविधि जुन्या इराणी लोकांमध्यें सार्वत्रिक नव्हता असें गृहीत धरण्यास कारणें आहेत, व पूर्वेकडील देशांत मझ्द धर्माचा प्रसार झाल्यावर हओमविधीची झरथुष्ट्र मतांशीं सांगड घालण्यांत आली. आर्यन् लोकांप्रमाणें इराणी लोकांनां देखील एका अमर करणार्या पेयाची माहिती होती व हें ते कित्येक धर्मविधींच्या प्रसंगीं पीत असत. सोमरस हें इराणी लोकांचें कदाचित् आवडतें पेय नसून केवळ प्राचीन परंपरागत जुन्या संप्रदायांतील म्हणून त्यांस तें घेणें प्राप्त झालें असावें.
गाथांच्या व त्यांमध्यें सांगितलेल्या धार्मिक मतांच्या अद्भुत स्वरूपावरून हीं मतें लौकिक धर्मांपासून उत्पन्न झालेलीं असावींत असें दिसत नाहीं, तर तीं एखाद्या विचक्षण बुद्धीच्या पुरुषानें प्रतिपादन केलीं असावींत असें वाटतें. हीं स्तोत्रें स्तुतिमय असून बहुतेक भविष्यासारखीं आहेत. उदाहरणार्थ, यस्न ३० म्हणतें :- ''येथें जमलेल्या तुम्हां लोकांस मी आतां मझ्दाच्या म्हणी, अहुराची स्तवनें, साधूंची स्तोत्रें, या पवित्र अग्नींतून निघणारें पवित्र सत्य सांगतों. हा साधु मूर्तिमंत अहुर मझ्द आहे, त्यानेंच ह्याला हे निवेदन केलें आहे, व त्याला हा नेहमीं प्रश्न विचारीत असतो.''
गाथा साक्ष देत असलेल्या सुधारणेचे हेतू दोन प्रकारचे आहेत. धर्माची शुद्धि व ईश्वराविषयींच्या अधिक प्रगत कल्पनांचें निवेदन, आणि परिभ्रमण वृत्ति टाकून देऊन शेतीचा स्थायिक धंदा करण्याची सामाजिक सुधारणा हे ते दोन हेतू होत. नांगर हातांत धरल्याशिवाय खर्या धर्माचें आचरण करण्याची इच्छा धरणें म्हणजे थोतांड होय. शेतकरी लोकच फक्त 'अश' व 'वोहुमनो' च्या अंतःकरणाचे आहेत. यांच्या बरोबर जे राहतात परंतु काम मात्र करीत नाहीत ते लोक आएस्मा अथवा तिटकारा किंवा मत्सर उत्पन्न करतात. उद्योगी व उत्साही शेतकरी निःसीम झरथुष्ट्री समजला जात असे.