प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
झरथुष्ट्र व गाथांमधील त्याचे सांप्रदायिक लोक - अवेस्तामध्यें झरथुष्ट्र हा मोठा धर्मसुधारक गणला जातो. अहुर मझ्दनें यालाच ईश्वरप्रणीत धर्म सांगितला होता व यानें तो प्राणिमात्रानां सांगितला. हा दरायसचा बापहिस्टापीझ याचा समकालीन होता असें कांहींचें मत आहे. तर इतरांच्या मतें ख्रि. पू. ६०० च्या सुमारास हा होऊन गेला. कांहीं थोडेजण त्याला मीडियन, पर्शियन, अथवा मीडिओपर्शियन समजतात, तर दुसरे कांहीं तो बॅक्ट्रियन अथवा बाबिलोनियन होता असें म्हणतात. या विविध मतात ऐतिहासिक सत्य कोणत्या बाजूस आहे हें ठरविणें फार कठिण आहे; व हिरोडोटसनें झरथुष्ट्रचा कांहींच उल्लेख केला नसल्यामुळें तर तें जवळ जवळ अशक्यच झालें आहे.
झरथुष्ट्र हें नांव निःसंदेह आर्यन् आहे. परंतु झरथुष्ट्र हा कदाचित् आपणांस परिचित असलेल्या इराणी भाषेच्या विकासाच्या अगोदरच्या काळांतील असावा, व म्हणून त्या शब्दाच्या अर्थाबद्दल बराच संदिग्धपणा आहे. अर्थाच्या या अनिश्चिततेवरून झरथुष्ट्र हा कोणी ऐतिहासिक पुरुष नसून नवीन धर्म ज्या पंथांतून निघाला त्यांतील ती एक काल्पनिक व्यक्ति होती अथवा मिथ्र देवाचेंच तें एक सगुण रूप असेल अशी कल्पना निघणें साहजिक आहे. कांहीं विद्वान लोक अवेस्ता व इतर इराणी धर्मग्रंथ यांमधील झरथुष्ट्रासंबंधींची हकीगत काल्पनिक अथवा रूपकात्मक समजतात; परंतु कांहीं झरथुष्ट्राला खरा ऐतिहासिक पुरुष समजून गाथांची रचना त्यानें किंवा त्याच्या शिष्यांनीं केली असें मानतात.
या वादग्रस्त प्रश्नांत फार खोल न शिरतां गाथासंप्रदायांतील कित्येक मंत्र झरथुष्ट्राचे आहेत असेंच आपण समजूं. एक स्तोत्र त्याला आपला कर्ता म्हणतें. गाथा उष्टवैति (यस्न ४३) मध्यें वर्णन केलें आहे कीं, देवता खुद्द वोहुमनो (नियुक्ता) सह येऊन तिनें झरथुष्ट्राला विचारलें; ''तूं कोण आहेस, तूं कोणाचा आहेस'' ? तेव्हां झरथुष्ट्रानें उत्तर दिलें कीं, ''मी झरथुष्ट्र आहे व दुष्टांचा शासनकर्ता व साधूंचा मित्र होण्याची व ईश्वरभक्तांची प्रीति संपादन करण्याची माझी इच्छा आहे. या कामीं मला अहुर मझ्द मदत करील व आरमैति सल्ला देईल.''
धृपदासारखीं जीं गीतें आहेत त्यांत देखील बोलणारा व धर्मसंस्थापक हे एकच आहेत. तथापि यावरून तें कवनहि त्याचेंच आहे असें अनुमान निघत नाहीं.
दुसर्या एका कवितेंत कवीनें विष्टपाला आपला आश्रयदाता व फ्रशावष्ट्राला सासरा म्हटलें आहे, व हे दोघेहि अहुर मझ्दाबरोबर स्वर्गांत राहतात असें तो म्हणतो.
जिच्यावरून झरथुष्ट्राच्या काळची माहिती अनुमानानें काढतां येते अशी शेवटीच गाथाच काय ती आहे. ही गाथा म्हणजे झरथुष्ट्राची सर्वांत वडील मुलगी पौरुचिस्त स्पितमी हिच्या लग्नाचें गाणें आहे. त्यांत झरथुष्ट्र, फ्रशावष्ट्र व पौरुचिस्त स्पितमी हे हयात असल्याचा उल्लेख आहे. परंतु बाकीचा बहुतेक भाग अस्पष्ट आहे.
एकंदरींत या ग्रंथांत ऐतिहासिक सत्य शोधण्यास उपयुक्त असे कांहींच आधार मिळत नाहींत. तथापि या सर्वांस निव्वळ रूपकात्मक समजण्यासहि कांहीं पुरावा नाहीं. यांत देवगंधर्वांच्या नांवांसारखीं नांवें आढळतात व झरथुष्ट्राच्या शिष्यांचीं नांवें रूपकात्मक दिसतात हें खरें. परंतु झरथुष्ट्राच्या संबंधांत पुढें प्रचारांत आलेल्या एकाहि रूपकात्मक गोष्टीचा मागमूस गाथांमध्यें आढळत नाहीं. गाथांमध्यें त्याचा अद्भुत जन्म, त्याचा मोह, त्याचें दुष्टांशीं भांडण, त्याला झालेला साक्षात्कार यांविषयीं कांहींच माहिती नाहीं. सारांश पुरातन काळचा झरथुष्ट्र हा अलीकडील झरथुष्ट्राहून अगदींच भिन्न दिसतो.
गाथांमधील त्याचे नातेवाईक व कट्टे शिष्य पूर्णपणें मानवी प्राणी आहेत. जरी विष्टप गाथा कवीचा राजा आहे तरी त्याचें राज्य जें मघह्य क्षेत्र तें काल्पनिक आहे. तो कव म्हणजे साधु आहे. फ्रशावष्ट्र व डे जमास्प या बंधुद्वयांपैकीं दुसरा कवि असावा. मैध्योमाओंघानें मझ्द धर्म जन्मभर पाळण्याचें ठरवून त्या धर्माचें शिक्षण घेतलें असें एका ठिकाणीं म्हटलें आहे. मैघ्यो माओंघाखेरीज बाकीच्यांनां ऐतिहासिक पुरुष कां समजूं नये हें समजत नाहीं. उलटपक्षीं गाथांमध्यें धर्मोपदेशकांबद्दल झरथुष्ट्र शब्द इतका वारंवार वापरला आहे कीं, झरथुष्ट्र ही सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणणार्या साधूंसाठीं वापरलेली पुरुषवाचक संज्ञा आहे असें वाटतें. परंतु हा तर्क सर्वस्वीं बरोबर असेलच असें म्हणतां येत नाहीं. अनेक दंतकथा उद्भूत झाल्यामुळें ज्याच्या चरित्रासंबंधीं संशोधन करणें कठिण झालें आहे असा झरथुष्ट्र हा कोणी मोठा सुधारक होऊन गेला असणेंहि संभवनीय आहे (इंडियन ॲटिक्वरी, पु. ११-१८).