प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

ट्राजन व मार्क ऑरीलिअस यांच्याशीं लढाया - पहिल्या व्हिलोजिसीझनंतर फार अंदाधुंदीचा काळ आला, या कालासंबंधीं वाङ्‌मयात्मक दंतकथा मूळींच उपलब्ध नाहींत; परंतु नाणीं व वाङ्‌मयांतील तुरळक उल्लेख यांवरून असें सिद्ध होतें कीं, इ.स. ७७-१४७ या काळांत एकाच वेळीं दोन किंवा तीन राजेहि राज्य करीत होते. अर्थात् या काळांत राज्यांत मुळींच शांतता नसली पाहिजे हें स्पष्ट आहे. या संधीचा फायदा घेऊन ट्राजननें पाश्चात्य संस्कृतीचा प्रसार करण्याकरितां हिंदुस्थानपर्यंत अलेक्झांडरचें राज्य जिंकण्याच्या इराद्यानें पार्थियन राज्यावर चढाई केली, व आर्मीनिया, मेसापोटेमिया व बाबिलोनिया हे प्रांत रोमन बादशहाच्या अंमलाखालीं आणले. ट्राजन मेल्यावर हेड्रिअननें ऑगस्टसचें धोरण स्वीकारून जिंकलेले देश परत केले. याच वेळीं कुशनचें प्रबल इंडोसिथियन राज्य उदयास आले व त्यामुळें पूर्व इराणांतील पार्थियन मुलूख बराच कमी झाला. तिसर्‍या व्हिलोजिसीझच्या (१४७-१९१) कारकीर्दीत शांतता फिरून नांदूं लागली. ११७ पासून रोमन राज्याशीं पूर्ण सलोखा होता, परंतु १६२ मध्यें आर्मीनिया व ओझोने या प्रदेशांबद्दल ऑरीलिअस व व्हीरस यांनीं पार्थियन राज्यावर हल्ला केला. ॲव्हिडिअस कॅशिअसच्या हाताखालीं रोमन लोकांनीं सिल्यूशिआ या ग्रीक शहराचा नाश केला (१६४); व त्यामुळें ग्रीक संस्कृति नष्ट होऊन अरमइक नामक पौरस्त्य संस्कृतीचा फैलाव होऊं लागला. ख्रिस्ती धर्मानें अरमइक वाङ्‌मय निर्माण करून या नवीन संस्कृतीच्या प्रसारास मदत केली. यानंतर ग्रीक संस्कृति व ग्रीक वाङ्‌मय यांचा परिचय अरमइक भाषेच्या द्वारें होत असे. तिसर्‍या व्हिलोजिसीझनें झरथुष्ट्राचे पवित्र लेख गोळा करून सध्यांच्या अवेस्ता ग्रंथास आरंभ केला, या सर्व गोष्टीवरून पार्थियन राज्यांत इराणच्या राष्ट्रीयत्वास हळू हळू कसा जोम मिळत गेला हें स्पष्ट दिसतें.

१६५ च्या तहानें वायव्य मेसापोटेमिया रोमला देण्यांत येऊन रोमन युद्ध संपले. इ.स. १९५-२०२ व २१६-२१७ या दोन वेळी पार्थियन राजे व रोमन बादशहा यांमध्यें अशाच झटापटी झाल्या; परंतु त्यांमुळें दोन्ही राज्यांच्या स्थितींत विशेष फरक झाला नाहीं.