प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
ग्रीसशीं लढाया - सायरस व कंबायसिस यांच्याप्रमाणें दरायसनें जरी नवीन प्रांत काबीज करण्याकरितां स्वार्या केल्या नाहींत, तरी ज्याच्या सरहद्दीवर त्याच्याच बरोबरीचीं दुसरीं साम्राज्यें असण्याऐवजीं लहान लहान राष्ट्रजाती व स्वायत्त समाज यांचा मुलूख असतो अशा साम्राज्यास आपला विसतार करणें भागच पडतें. उत्तरेकडील भटक्या लुटारूं लोकांचा बंदोबस्त करीत असतां दरायसला सिथियन लोकांवर स्वारी करावी लागली; व त्याचमुळें थ्रेस व मॅसिडोनिया हे प्रदेश त्याला खालसा करावे लागले. येणेंप्रमाणें भूमध्यसमुद्राच्या किनार्याचा बराचसा भाग साम्राज्यांत सामील होतांच त्याबरोबर इतर अनेक लढे उद्भुत झाले. कार्थेजच्या लोकांनीं ग्रीसच्या उलट इराणचा पक्ष घेतला. उदायसने कार्का या नांवाखालीं हें शहर व मॅक्सिअन्स हीं आपल्या राज्यांतील असल्याचा उल्लेख केलेला आहे. ग्रीसमधील शहरांचे आपसांत नेहमीं तंटेबखेडे चालत व मध्यस्ती करण्याकरितां ते दरायसला बोलावीत. परंतु दरायस कधीं यूरोपीय राजकारणांत फारसा पडला नाहीं. सरतेशेवटीं अथेन्स व इरीट्रीआ या शहरांनीं अयोनियन व कॅरिअन बंडखोरांनां मदत केल्यामुळें लढाई करणें अपरिहार्य झालें (ख्रि. पू. ४९०). पण केवळ मार्डोनिअसची (४९२) व डेटसची (४९०) स्वारीच नव्हे तर कार्थेजच्या मदतीनें क्सक्सींझनें जय्यत तयारी करून केलेल्या स्वार्यादेखील सर्वस्वीं फसल्या (ख्रि.पू. ४८०-४७९). मॅराथॉन व प्लाटीआ येथील रणभूमीवर ग्रीक सैनिकांनीं इराणी तिरंदाजांनां शरण यावयास लावलें, परंतु अथेनिअन थेमिस्टोक्लीझनें ग्रीक आरमाराचें इराणी-फिनीशियन आरमारावरील श्रेष्ठत्व सालामिस येथें सिद्ध करून त्यांची जमिनीवरील यशाची आशा नष्ट केली व अशा रीतीनें युद्धाचा खरा निकाल लावला. क्सक्सींझच्या स्वारीचा मोड झाल्यापासून इराणी राज्यास उतरती कळा लागली. ग्रीक लोकांचें श्रेष्ठत्व इतकें स्पष्ट दिसून आलें कीं, इराणी लोकांनीं पुन्हां स्वारी करण्याचें धाडस कधींहि केलें नाहीं. उलट पक्षीं ख्रि. पू. ४६६ मध्यें इराणी सैन्य व आरमार यांचा सायमननें युरिमिडॉन येथें पुन्हा पराभव केला, व याचा परिणाम असा झाला कीं, आशियाच्या किनार्यावरील ग्रीक प्रांत व सर्व थ्रेशियन मुलूख इराणी लोकांच्या हातचा गेला. इराणी राज्यासारख्या मोठ्या राज्याचें एवढासा प्रदेश गेल्यामुळें फारसें नुकसान झाले नाहीं; व सायप्रस घेण्याचे व बंडखोर इजिप्शियन लोकांच्या साहाय्यानें नाइल नदीचें खारें जिंकण्याचे अथेन्सचे प्रयत्नहि यशस्वी झाले नाहींत. इराणी साम्राज्यावर स्वारी करण्याची अथवा मोठ्या प्रमाणावर नवीन मुलूख काबजी करण्याची ताकद अथेन्सच्या लोकांच्या अंगांत वस्तुतः नव्हती. हेलेनिक संस्थानांत चालू असणार्या भांडणांमुळें अथेन्सला कॅलिअसचा तह (ख्रि. पू. ४४८) करून इराणशीं लढण्याचा नाद सोडावा लागला; सायप्रस व इजिप्त ही इराणच्या बादशहाकडेच ठेवावीं लागलीं; व समुद्रकांठची शहरें परत न मिळतां अथेनियन लोकांवर पुन्हां स्वारी न करण्याचें इराणच्या बादशहानें वचन दिलें तेवढ्यावरच संतुष्ट रहावें लागलें. सालामिस व प्लाटीआ येथील पराजयांमुळें इराणी साम्राज्याच्या अंगीं इतर राष्ट्रांवर चढाई करून जाण्याची शक्ति राहिली नाहीं; व जगाच्या इतिहासांतील इराणी साम्राज्याचें महत्त्व थोडा वेळ कमी होऊन इजिअन समुद्राचें वाढूं लागलें; व ग्रीक लोक आयुधें व बुद्धि या बाबतींत आपणांपेक्षां कमी नाहींत, त्यांचे केवळ शक्तीच्या जोरावर पारिपत्य करणें शक्य नाहीं व ते लोक आपल्याहि फौजेंत उपयोगी पडतील अशी इराणी लोकांनां जाणीव झाली.