प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

कंबायसिस व स्मेर्डिस - सायरसच्या मृत्यूनंतर (ख्रि. पू. ५२८) त्याचा मुलगा कंबायसिस यानें इजिप्‍त (ख्रि. पू. ५२५) जिंकलें. सायप्रस व आशिया मायनरच्या किनार्‍यावरील बेटें शरण आलीं. सॅमॉस दरायसनें घेतले. नपाता व मेरोइ या इथिओपिअन राज्यांवरील स्वारीचा मात्र न्यूबिआमध्यें मोड झाला. स्मेर्डिसला पदच्युत करून (ख्रि. पू. ५२२-५२१) मारल्यामुळें दरायसविरुद्ध बाबिलोन, सुशिआना, पर्सिस, मीर्डीया, आर्मिनिया व इतर पूर्वेकडील बर्‍याच प्रांतांत बंडें झालीं; परंतु त्यांचा दरायस व त्याचे सेनापती यांनीं (ख्रि. पू. ५२१-५१९) मोड केला.