प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

उत्तरकालीन ग्रीक युध्दें व ॲटॅल्सिडसचा तह - तथापि याच काळांत राज्याचें परराष्ट्रीय धोरण बरेंच यशस्वी झालें (ख्रि. पू. ४१३). सिराक्यूस येथें अथेनियन सत्तेचा मोड झाल्यामुळें, ग्रीक शहरांपासून वसूल करावयाची खंडणी गोळा करण्याचा हुकूम दुसर्‍या दरायसनें आशियामायनरमधील क्षत्रपांनां केला. स्पार्टाबरोबर इराण अथेन्सविरुद्ध लढाईंत पडलें, व इराणी पैशाच्या जोरावरच लायसँडरला अथेन्सचा मोड करतां आला (ख्रि. पू. ४०४). पुढें लढाईमधील लुटीच्या वांटणीबद्दल स्पार्टा व इराण यांच्यामध्यें तंटा उद्‍भवून इराण स्पार्टाविरुद्ध ग्रीक संघांत सामील झालें. ख्रि. पू. ३९४ मध्यें नायडस येथें लॉसिडिमोनिअन आरमाराचा इराणी क्षत्रपांनीं निःपात केला व ख्रि. पू. ३८७ मध्यें अँटूल्सिडसचा तह करून स्पार्टानें मोठ्या कष्टानें आशियांतील प्रदेशावरील आपला हक्क सोडून देऊन इराणी बादशहांचें ग्रीसवरील प्रभुत्व कबूल केलें. अतःपर इराणी बादशहाच्या इच्छेला ग्रीसमध्यें कायद्याप्रमाणें मान मिळूं लागला; व पुढें कांहीं कालपर्यंत कोणत्याहि हेलेनिक संस्थानानें इराणी साम्राज्याच्या शांततेचा भंग करण्याचें धाडस केलें नाहीं.

हा विजय इराणी लोकांनां ग्रीक लोकांमधील आपसांतील यादवीमुळें मिळाला. तथापि इराणी राजांनां इजिप्‍त पुन्हां जिंकतां आला नाहीं अगर सायप्रसमधील सालामिसच्या राजाचा पूर्ण बंदोबस्तहि करतां आला नाहीं. यावरून इराणी राजांचा कमजोरपणा व्यक्त होतो. दिवसानुदिवस क्षत्रपांचीं बंडें अधिकाधिक भयंकर स्वरूप धारण करूं लागलीं. दुसर्‍या आर्टाक्सर्क्सीझची कारकीर्द ख्रि. पू. ३५९ मध्यें संपली तेव्हां पश्चिमेकडील प्रदेशावरील बादशाही सत्तेचा समूळ लोप झाला होता. त्याच्या मागून तिसरा आर्टाक्सर्क्सीझ ओकस हा गादीवर बसला. त्यानें मात्र साम्राज्याला पुन्हां पूर्वीचे चांगले दिवस आणून दिले. ख्रि. पू. ३५५ मध्यें त्यानें अथेन्सच्या सत्तेचा तिसर्‍यांदा मोड केला, ३४३ मध्यें इजिप्‍त घेतलें व त्याच्या सेनानायकांनीं आशियामायनरमधील सर्व पुंडाई मोडून टाकली. हा राजा ख्रि. पू. ३३८ मध्यें मेला तेव्हां निदान बाह्यतः तरी इराणी साम्राज्याची पूर्वीपेक्षां सर्वांत जास्त भक्कम पायावर स्थापना झालेली दिसत होती.

हे सर्व विजय ग्रीक सैन्य व सेनानायक यांच्या मदतीनेंच मिळालेले होते. उपर्युक्त क्रिया चालली असतांच पगारी सैनिक, व्यापारी, शिल्पकार, वारांगना, गुलाम या लोकांमार्फत ग्रीक सुधारणेचा इराणमध्यें जास्त जास्तच फैलाव होत होता. हेलेन श्रेष्ठ आहे यासंबंधीं उभयपक्षीं वाद नव्हता. ग्रीक लोकांनां राष्ट्रीय सैन्यांत नोकर ठेवून इराणी लोक संकटांपासून आपला बचाव करून घेत, व ग्रीक लोकांच्या व्यवहारनीतीचा फायदा घेऊन आपल्या राज्याचें हित साधीत असत. ग्रीक संस्थानांच्या परस्परांतील चुरशीमुळें होत असलेल्या भांडणांत जीं शहरें गुंतलेलीं नव्हतीं तेथील लोकांनां जगाचें राज्य करण्यास लायक असलेल्या अशा ग्रीक लोकांनां जगाचें राज्य करण्यास लायक असलेल्या अशा ग्रीक लाकांनीं आशियांतील दुर्बळ राजांचे हुकूम पाळावे ही गोष्ट फार टोंचत असे. आयसॉक्राटीझ, कॅलिस्थिनीझ व इतर असंख्य लेखकांनीं ही राष्ट्रीय मनोभावना व्यक्त केली होती. स्वसंतोषानें अथवा सक्तीनें ग्रीक लोकांचें ऐक्य करून इराणविरुद्ध चढाई करावी असें हे लोक प्रतिपादीत असत.