प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

इराणी वसाहतीचा काळ - हा काळ अद्यापि निश्चयात्मक रीतीनें ठरवितां येत नाहीं. तथापि तो ख्रिस्तपूर्व तीनचार हजार वर्षे धरला तरी वावगें होणार नाहीं. ख्रिस्तपूर्व १५००च्या अमर्ना लेखामध्यें अनेक आर्यन् नांवें दृष्टीस पडतात. अर्तमन्य, अर्झवीय, शुवर्दात, शिवाय 'वर्झन' हा अंत्य असलेलें एक नांव, दशरत्त हीं सर्व नांवें आर्यन् वंशाचें इजिप्‍तपर्यंत गमन दाखवितात. ख्रिस्ती शकापूर्वी इराणी लोक या काळाच्या सुमारास पश्चिमेस बरेच लांब पसरले असून त्यांचे व्यापारी नायक मेसापोटेमिया व सिरिया या देशांत जाऊन पोंचले होते; व त्यांनीं तेथें राज्यें स्थापलीं होतीं हें आज स्पष्ट आहे. तिसर्‍या विभागांत पर्शूंच्या संबंधानें प्राचीन माहिती आलीच आहे. त्यावरून सुदासच्या मदतीला वेदपूर्वी कालींच ते आले होते असें दिसून येईल. इराणांत जाती अनेक असल्या तरी विशेष कर्तृत्वानें पुढें आलेल्या जाती म्हटल्या म्हणजे पृथू, पर्शू, मग व मीड (संस्कृत ग्रंथकारांनीं उल्लेखिलेल्या मेदांशीं यांचा संबंध असेल काय ?) या होत. इराणतर्फे प्रामुख्य घेऊन पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे संबंध उत्पन्न करणार्‍या याच जाती होत.

मीड किंवा मिडी यांचा संबंध पश्चिमेकडे येतो. दुसरा शॅल्मानीझर या असुरी राजानें मीड लोकांशीं ख्रि.पू. 36 या वर्षी लढाई केली होती व त्यानंतर पुढें मीड लोकांचा उल्लेख असुरी इतिहासांत आढळतो. ख्रि. पू. ७१५ मध्यें सारगॉन यानें अनेक मीड संस्थानिकांपासून खंडणी वसूली केली होती. त्यानें दिलेल्या या संस्थानिकांच्या नांवांपैकीं जीं २३ आज उपलब्ध आहेत त्यांतील बहुतेक सर्व निःसंशय इराणीच दिसतात. अर्थात् मीड लोक हे इराणीच असले पाहिजेत हें उघड आहे. मीड लोकांसंबंधींच्या असुरी आधारांवरून इराणी लोक इराणच्या पश्चिमेस ख्रि. पू. ९०० च्या अगोदरच जाऊन पोहोंचले असावेंत हें स्पष्ट दिसून येतें.