प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

एफथालाइट अथवा श्वेतहूण - इ.स. ४५० मध्यें या श्वेतहूण लोकांनीं बॅक्ट्रिया देश घेऊन कुशन राजसत्ता नष्ट केली. या लोकांनीं सस्सन राजांच्या सत्तेसहि उतरती कळा लावली. पेरोझ राजा (४५७-४८४) या लोकांशीं लढतां-लढतांच मरण पावला. त्याचा भाऊ बालाश (४८४-४८८) यास या लोकांनीं पदच्युत करून पेरोझचा मुलगा पहिला कवध (४८८-५३१) याला गादीवर बसविलें. परंतु देशांतील बंडळीमुळें त्याला पदच्युत होऊन एफथालाइटाच्या आश्रयास जावें लागलें. इ.स. ४९९ मध्यें मागील अनेक आर्सेसिडी राजांप्रमाणें हाहि दाह व शक लोकांच्या मदतीनें पुन्हां गादीवर आला. या अंतस्थ भानगडीमुळें रोमन लोकांविरुद्ध चाललेलें भांडण बंद पडून इराणी व ख्रिस्ती संप्रदायांतील वैमनस्य मंदावत चाललें होतें. इराणी ख्रिस्ती लोकांत आतां नेस्टोरिअन मताचें प्राबल्य झालें होतें. ४८३ मध्यें तर एका धर्मसभेनें सार्वजनिकरीत्या या नेस्टोनिअन पंथाचा स्वीकार केला व यानंतर हा पंथच इराणी साम्राज्यांतील ख्रिस्ती संप्रदाय झाला. सिल्यूशिआ-टेसिफॉन येथील अधिकारी हा या पंथाचा मुख्य होता.