प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

गाथाकार व त्यांच्या गाथा - जेव्हां गाथाकार कवी साओष्यंत संबंधी वर्णन करतात, तेव्हां ते स्वतःविषयींच वर्णन करीत आहेत कीं काय अशी शंका येते, पण तसें निश्चयात्मक म्हणतां येत नाहीं. साओष्यन्त शब्दाचा मूळ अर्थ दुसर्‍याच्या उपयोगीं पडणारे लोक असा आहे, पण येथें त्याचा ''मुक्ति देणारे साधू'' हा अर्थ उत्तम लागू पडतो. नवीन अवेस्तामध्यें याचा अर्थ जगाच्या अंतीं येणारे व सर्व वस्तूंचें पुनरुज्जीवन करणारे ज्ञानी पुरुष असा केला आहे; परंतु जुन्या ग्रंथांत असा अर्थ आढळत नाहीं. गाथाकार कवी यांनां मानव जातीचे उद्धारक समजतात. याशिवाय यांनां दुसरींहि नांवें आहेत. एकजण आपणांस झओत्तर म्हणजे संस्कृत होतर म्हणवितो, दुसर्‍याला स्वतःस रतु म्हणणें आवडतें, आणि सामान्यतः ते स्वतःचा मथ्रन या नांवानें उल्लेख करतात. मथ्रन शब्दाचा अर्थ भविष्यवादी किंवा ज्ञानी पुरुष असा आहे.

अलीकडील काळांतील धर्मोपदेशकाची प्रचारांतील संज्ञा अथ्रव्हन ही गाथांमध्यें आढळत नाहीं. परंतु हा शब्द अग्निपूजक या अर्थाचा असून मागून झालेल्या अवेस्तामध्यें तो फार आढळतो. हल्लीं विशेष प्रचारांत नसलेला जो मगियन किंवा मगी शब्द त्याचीहि हीच स्थिति नसेलना ? कांहीं म्हणतात त्याप्रमाणें ज्युडीआवरील नेब्युकॅडनेझारच्या स्वारीबरोबर असलेला रब मग हा मगांचा मुख्य होता असें मानल्यास तो मीडियांतून बाबिलोनियांत आला असला पाहिजे.

गाथांत आढळणार्‍या मग्वनचें मगियनशीं तादात्म्य सिद्ध झालें नाहीं, किंवा हा शब्द मगचा सजातीय आहे हें देखील ठरलें नाहीं. ज्या दोन उतार्‍यांत त्यांचा उल्लेख केला आहे, तेथें त्यांचा अर्थ प्रबल असा आहे. झरथुष्ट्राच्या मताचा कवि, लोकांनीं झरथुष्ट्राचा व त्याच्या शिष्यांचा उपदेश ऐकावा व मगाचीं अपवित्र कृत्यें सोडून द्यावींत असें सांगतो. परंतु उलटपक्षीं आपणांस ''मोठा पुरवठा करणारा मग'' व ''वोहुमनोचा मग'' असेंहि म्हटल्याचे उल्लेख आढळतात.

मग याचा अर्थ शक्ति-धर्मोपदेशकांची अद्‍भुत अथवा दैविक शक्ति व म्हणून जादू-असाहि करतां येईल. झरथुष्ट्राच्या अनुयायानें उपयोजिलेली शक्ति व 'दएवा' च्या 'पुरोहितानें उपयोजिलेली शक्ति यांत फरक एवढाच कीं, पहिला चांगल्या कामाकरितां व दुसरा दुष्ट कामाकरितां' या शक्तीचा उपयोग करीत असे. सारांश अवेस्तामध्यें मगियन म्ह. मगी मुळींच आढळत नाहींत. हे गाथाकार कवी कोणीहि असोत, पण एवढें मात्र उघड दिसतें कीं, त्यांची, आपलें विशिष्ट कार्य, धंदा व आपल्या मतांचें गांभीर्य यांविषयीं फार उच्च कल्पना होती. जरी धर्माची संस्थापना करणार्‍या पुरातन द्रष्टयाविषयीं त्यांचा फार आदर दिसून येतो व या द्रष्टयांस ते झरथुष्ट्राहूनहि प्राचीन समजतात, तरी ते आपण प्राचीन द्रष्टयांच्या मतांचे विवरण कोठें करीत आहोंत व स्वतःची मतें कोठें प्रतिपादन करीत आहोंत हें स्पष्ट करीत नाहींत. वैदिक ॠषींप्रमाणें गाथाकारहि आपणांस गाथांचे द्रष्टे समजतात. त्यांचीं मतें तींच मझ्दाची मतें असें दर्शविण्यांत आलें असून ते मझ्दास आपल्या मित्राप्रमाणें समजतात. उलटपक्षीं जे लोक या उपदेशाप्रमाणें चालणार नाहींत त्यांनां नरकवास प्राप्‍त होईल. मंथ्र म्हणणारांनां दुष्टांचें शासन करतां येतें. मंथ्र द्रुजांचा (दुष्टांचा) वध करतात. हे कुमार्गाचा उपदेश करणारे दुष्ट, लोकांपासून त्यांना वोहुमनो (नियुक्ता) कडून प्राप्‍त होणारीं त्यांची इष्ट सुखें हिरावून घेतात, व हे सदगुणी माणसांनां दुराचरणास प्रवृत्त करतात.