प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
झरथुष्ट्र धर्माची जन्मभूमि - झरथुष्ट्र धर्माची जन्मभूमि व अवेस्तांतील गाथा जेथें रचण्यांत येऊन कित्येक वर्षे पाठांतरानें एका पिढीपासून दुसर्या पिढीकडे चालत आल्या तो देश हे एकच असतील असें नाहीं. गाथा तयार झाल्यावर त्या लेखनिविष्ट करण्याची क्रिया पुढें निरनिराळ्या ठिकाणीं होऊं शकेल.
अत्यंत प्राचीन पाठ असलेल्या गाथा बहुधा जेथें गाथाकार कवींची भाषा प्रचारांत होती त्या देशांत रचल्या गेल्या असाव्यात. ही भाषा कोणत्या प्रांतांत प्रचलित होती हाच आपल्यापुढें प्रश्न आहे. गाथांचीं निरनिराळीं पुस्तकें सारखीच प्राचीन नाहींत व एक दुसरीहून पुरातन अशा दोन भाषांत लिहिलेलीं आहेत. उत्तरकालीन गाथापुस्तकांचा बराचसा भाग भिन्न देशभाषा असलेल्या मुलखांत, धार्मिक ग्रंथांत जुनी पवित्र भाषाच वापरली पाहिजे अशा समजुतीच्या लोकांकडून रचला गेला असला पाहिजे. कांहीं गाथाग्रंथांत पर्शियन भाषेचा परिणाम झाला असल्याच्या खुणा दृष्टोत्पत्तीस आल्याहि आहेत. परंतु हें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, या निरनिराळ्या गाथाग्रंथांच्या भाषा कोणत्या प्रांतांतील आहेत हें ठरविलें तरी झरथुष्ट्र धर्माची जन्मभूमि निश्चित होऊं शकत नाहीं. अवश्यक पुराव्याची अत्यंत उणीव असल्यामुळें हा प्रश्न सोडविणें कठिण आहे. तथापि मझ्द धर्माचें मूळ ठिकाण, ज्याला हल्लीं आपण पर्शिया किंवा मुख्य इराण म्हणतों तें नव्हे हें निश्चयात्मक सांगतां येतें.
या प्रश्नासंबंधीं निरनिराळ्या लेखकांनीं निरनिराळी अनुमानें प्रकट केलीं आहेत. कांहींच्या मतें या धर्माची जन्मभूमि पूर्वइराण ही आहे. ते वेंदिदादच्या पहिल्या फर्गंदाचा (खंडाचा) आधार देतात. या खंडांत आलेलीं स्थलादिकांचीं नांवें पूर्वइराणांतील आहेत असें जरी गृहीत धरलें तरी तेवढ्यावरून तो पूर्वइराणांत उत्पन्न झाला असेल असें अनुमान निघत नाहीं. कारण इराणी धर्माच्या जन्मभूमीसंबंधीं हकीकत देणें हा त्यांत कर्त्याचा उद्देश नसून त्याला केवळ इराणी धर्माच्या वर्चस्वाखालीं असलेल्या प्रदेशाविषयीं बोलावयाचें आहे असें दिसतें. अर्थात् इराणी धर्माचा जन्म दुसरीकडेच कोठें होऊन मागून तो पूर्व इराणांत प्रचारांत आला असेल.
मीडिया ही या धर्माची जन्मभूमि आहे, हें दुसरें अनुमान देखील वरच्याप्रमाणेंच निराधार दिसतें. ज्यांचा पुरातन व नवीन धर्मग्रंथांत एकदांहि उल्लेख नाहीं ते मगी लोक धर्मसंस्थापक कसे असूं शकतील ? मीडिया जर या धर्माची जन्मभूमि म्हणावी तर मीडियाचा किंवा त्याच्या राजधानीचा गाथाग्रंथांत मुळींच उल्लेख सांपडत नाहीं हें कसें ? तात्पर्य, हें अनुमान अगदींच असंभवनीय आहे, ही गोष्ट खुद्द अवेस्ता ग्रंथावरूनच सिद्ध होऊं शकते.
झरथुष्ट्राची धर्मसुधारणा उत्तर अथवा वायव्येकडील इराणांत झाली अशी तिसरी एक उपपत्ति आहे.
आर्यनेज वैजो (आट्रोपाटकिन, अजर बैजान) ही आर्य लोकांचीं मूल भूमि होती असें म्हणतां येईल. कारण हिचा वेंदिदामध्यें मझ्दनें निर्माण केलेल्या देशांपैकीं पहिला देश असा उल्लेख आला आहे.
आर्य लोकांची ही वास्तविक भूमि असतां तिची पुढें इतकी विस्मृति झाली कीं, तिची केवळ स्वर्गांत गणना होऊं लागली. एका दंतकथेप्रमाणें झरथुष्ट्र येथेंच जन्मला होता. आणि येथूनच पार्थियन राजांच्या अंमलांत मझ्दयस्न धर्माचें पुनरुज्जीवन झालें. म्हणून येथें झरथुष्ट्राचा धर्म निर्माण झाला ही गोष्ट असंभवनीय नाहीं. सारांश झरथुष्ट्राचा धर्म या वायव्य किंवा उत्तर इराणांत जन्म पावून नंतर खालीं मीडियांत व अलीकडे पूर्व इराणांत प्रसार पावला असावा.
या भविष्यवाद्याची अथवा मझ्द उपासनेची जन्मभूमि मीडियाच्या ईशान्येंतील रघ हें ठिकाण होती, ही दंतकथा विशेषशी शक्य कोटींतील दिसत नाहीं. रघ हें धर्मोपदेशकांचें फार पुरातन शहर होतें. ससेनाइड काळांत येथें मुख्य मगी रहात असे; व यापूर्वी जेव्हां वेंदिदाद लिहिलें गेलें तेव्हां येथें झरथुष्ट्रोतेमो नांवाचा मुख्य धर्माधिकारी राज्य करीत होता. यावरून हें शहर झरथुष्ट्राची जन्मभूमि कशी मानली गेली याचा सहज उलगडा होतो. कोणत्याहि धर्माच्या धर्मोपदेशकाच्या संस्थेचें मुख्य ठिकाण त्या धर्माचें उदयस्थान असलेंच पाहिजे असें नाहीं. मझ्दनें निर्माण केलेल्या देशांत रघचा उल्लेख प्रथम आला नसून मध्येंच अथवा कोठें तरी आला असल्यामुळें यावरूनहि सदरहू तर्कास पुष्टि मिळूं शकत नाहीं (इं. अँ. पु. ३४, पृ. ६०-६६).