प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
दरायसची राज्यव्यवस्था व पद्धति - या राज्यव्यवस्थेचें बरेंचसें श्रेय सायरसला दिलें पाहिजे. दरायसनें फक्त त्याचें अनुकरण करून ही व्यवस्था पूर्णत्वास आणली. राज्याची घटना सर्वत्र उदार व स्वतंत्र धोरणावर रचलेली असून तीमध्यें क्षुद्रतेचें किंवा भीरुत्वाचें कोणतेंच लक्षण नव्हतें. सर्वशक्तिमान् ईश्वर अहुरमझ्द यानें आपणांस जगाचें राज्य दिलें असून आपणच जगाचे मालक आहों अशी लोकांची पूर्ण भावना होती. लोक व राजा हे दोघेहि अहुरमझ्दाचेच उपासक होते. बहुतेक सर्व सुधारलेलीं राष्ट्रें दरायसच्या वर्चस्वाखालीं असून बाकीचे अज्ञानी देश त्याच्या दृष्टीनें बिनमहत्त्वाचे होते. या राष्ट्रांनां अहुरमझ्दाच्या कृपेनें एकत्र करून त्यांच्यावर न्यायानें राज्य करणें हें आपलें कर्तव्य आहे असें दरायस समजत असे.