प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
दृष्टान्त कथा - बुद्ध व ख्रिस्त यांच्या एकेरी वचनांसबंधानें व दृष्टान्तकथासंबंधानें पाहतां, त्यांतील संभवनीय परस्परसंबंध दन्तकथांपेक्षांहि कमी प्रमाणांत आहे असें दाखवितां येतें. बहुतेक उदाहरणांत सामान्य सादृश्य असतें इतकेंच; किंवा अशा सामान्य कल्पना असतात कीं, तसल्या कल्पना सर्व संप्रदायांच्या पवित्र ग्रंथांत साहजिकच यावयाच्या व प्रत्यक्ष येतातहि. उदाहरणार्थ, सत्कृत्याचें बीजारोपण व फलप्राप्तीसंबंधींचा संवाद असलेलें मज्झिमनिकाय ११०, आणि पेरणी करणार्याचा दृष्टान्त (मॅथ्यू १३. १८) यांची तुलना करा. किंवा 'इह लोकीं तुम्ही स्वतःकरितां धनसंचय करीत बसूं नका, कारण त्याला कसर लागून व गंज चढून तो बिघडणारा आहे' ही 'खरा संग्रह' या संबंधाच्या सुत्तांतील कल्पनाच मॅथ्यू ६.१९ मध्यें आलेली आहे ती ताडून पहा.
येणें प्रमाणें चार शुभवर्तमानांची बौद्धग्रंथांशीं तुलना करतां ज्या गोष्टी निदर्शनास येतात त्यांचा सारांश असा दिसतो कीं, त्यांत ऐक्यभावापेक्षां फरकच पुष्कळ अधिक आहेत. अगोदर ज्या दन्तकथांची तुलना करतां येण्यासारखी आहे, त्यांचें स्वरूपच सर्वस्वीं भिन्न भिन्न प्रकारचें आहे. इकडे बौद्धधर्मांत सर्व चमत्कार कर्मवादानें म्हणजे पूर्वजन्मांतील कर्माचीं फलें म्हणून उलगडून सांगितले आहेत, तर तिकडे ख्रिस्ती चमत्कार, ईश्वर दया व सामर्थ्य यांचे परिणाम होत असें म्हटलें आहे.
एडवर्ड लेहमन जें म्हणतो कीं, हिंदूलोकांच्या अभिरुचीला ख्रिस्ती कथांमधील गोष्टींनां दिलेलीं कारणें अगदीं अपुरीं आहेत असेंच नेहमीं वाटणार, आणि उलट आपणां ख्रिस्तानुयायांनां हिंदू कथांची प्रबल कारणेंहि - अगदीं शुद्ध साधुत्वाच्या दृष्टीनें पाहिलीं तरी बहुतेक निराधार अशीं वाटणार, तें अगदीं बरोबर आहे.