प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
पहिला येझ्देगर्द - इ.स. ३७९ त दुसरा शापुर मेल्यानंतर सस्सन साम्राज्यांत बंड होऊन सरदारांनीं त्याचा भाऊ दुसरा अर्देशिर याला गादीवर बसविलें, पण लवकरच ३८३ मध्यें त्यास पदच्युत करण्यांत आलें. नंतर दुसर्या शापुरचा मुलगा तिसरा शापुर यास गादीवर बसविण्यांत आलें. परंतु ३८८ मध्यें त्याचा व नंतर ३९९ मध्यें त्याचा भाऊ चौथा बहराम याचा खून झाला. या बहरामचा मुलगा पहिला येझ्देगर्द (३९९-४२०) हा मात्र मोठा उत्साही व हुषार राजा होऊन गेला. यानें सर्व सरदारांनां आपल्या कह्यांत ठेवून त्यांच्या बंडखोरपणाबद्दल त्यांनां कडक शासन केलें. त्याने मगी पंथापासून स्वतंत्र होण्याचा देखील प्रयत्न केला. इराणी ख्रिस्ती लोकांचा छळ करणें बंद करून त्यांनां व्यक्तिस्वातंत्र्य दिलें. परंतु हा मारला गेला व लोक याच्याशीं इतके राजा झाले होते कीं, त्याच्या मुलांपैकीं कोणासहि तो गादीवर बसविण्यास कबूल होईनात.