प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

पर्शियन लोक - जेते लोकांनां राज्यांत अर्थातच जास्त हक्क व सवलती मिळत असत. पर्सिसच्या (कार्मेनियन व युटिअन इत्यादि लोक खेरीज करून) रहिवाश्यांनां कोणताच कर द्यावा लागत नसे. त्यांची एक निराळीच क्षत्रपी म्हणजे प्रांत बनविला होता. हे लोक कराच्या ऐवजीं राजास आपल्या मालांपैकीं उत्तम उत्तम जिनसांचा नजराणा करीत असत. उदाहरणार्थ, राजा स्वारीवर वगैरे निघाला म्हणजे शेतकरी लोक त्याला भेटून उत्तम फळफळावळ नजराणा म्हणून देत असत. उलट पक्षीं राजा देखील त्यांनां लढाईंतील लूट व इतर मौल्यवान देणग्या वांटून देत असे. राज्यारोहणप्रसंगीं पासार्गाडी येथील रणदेवतेच्या देवळांत राजाला राज्याभिषेक होत असे तेव्हां तो साधें शेतकर्‍याचेंच जेवण जेवीत असे. या प्रसंगीं पर्शियन लोक त्याची इमानें इतबारें चाकरी करण्याची शपथ घेऊन त्याच्या आयुरारोग्याबद्दल अहुरमझ्द देवाची प्रार्थना करीत असत; व राजा त्यांचे परकीयांपासून रक्षण करण्याची व त्यांच्यावर न्यायानें राज्य करण्याची शपथ घेत असे. सारांश पर्शियन लोकांच्या बाबतींत राजा हा 'लोकांचा राजा' म्हटला जात असे. न्यायनिवाडा करण्याकरितां राजाकडून तहाहयात पर्शियन न्यायाधीश नेमले जात असत, व त्यांच्या जागा बहुधा त्यांच्या मुलांकडेच वंशपरंपरा चालत असत. लोकपक्षाच्या पुढारी लोकांचा सल्ला घेऊनच कोणत्याहि बाबतींत न्याय निवाडा करावयाचा तो राजा करीत असे. इतर अधिकारी व प्रातांधिकारी यांच्या सल्लामसलतीस देखील असेच निवडलेले बडे लोक असत.

शस्त्र हातीं धरण्यास समर्थ असलेल्या प्रत्येक पर्शियन इसमास राजाची लष्करी नोकरी करणें भाग होतें. मोठे जमीनदार घोड्यावर बसून तर साधारण लोक पायदळांत नोकरी करीत. ज्यांनां आपल्या जमिनीची मशागत स्वतः करावी लागत नसे अशा सरदार व सुखवस्तू लोकांनां शक्य तितक्या अधिक वेळां दरबारांत हजर रहावें लागत असे. त्यांच्या मुलांनां राजपुत्रांबरोबर दरबारांत घोड्यावर बसणें, शस्त्रास्त्रांचा उपयोग करणें, शिकार खेळणें कायदेकानू१ व राज्यकारभाराचीं कामें यांचा अभ्यास करणें इत्यादि शिक्षण मिळत असे. व जे लायक ठरत त्यांनां पुढें मोठमोठ्या हुद्दयाच्या जागांवर नेमून जमिनी देत असत.

मगिअनला मारण्याच्या वेळीं जे दरायसच्या मदतीश हजर होते, त्या सहा घराण्यातील लोकांचा दर्जा अति उच्च होता. ग्रीक लोक राजा व हे सहा यांनां ''सात पर्शियन'' म्हणत असत. यांनां वर्दी दिल्याशिवाय राजाच्या समोर जाण्याचा अधिकार होता व यांनां देशांत राजाप्रमाणेंच जहागिरी वगैरे उत्पन्नें होतीं. याशिवाय इतर कित्येक पर्शियन लोकांनां दुसर्‍या प्रांतांत पाठवून तेथें त्यांनां जमिनी देऊन चिरस्थायी करण्यांत आलें होतें. ॲकिमेनिड काळांत ही वसाहत करण्याची चळवळ सर्व राज्यभर फार जोरानें प्रचलित होती. विशेषतः आर्मीनिया, कॅप्पाडोशिया, लिशिआ, सिरिया व इजिप्‍त येथें वसाहती करण्यांत आल्या. या वसाहती म्हणजे प्रांतांतील लष्करी मदतीचीं केवळ केंद्रस्थानेंच होतीं; व त्यांच्या योगानें संबंध इराणी राज्याला आधारस्तंभाच्या प्रमाणें बळकटी आली होती. खुद्द पर्सिसमध्यें ज्याप्रमाणें राजाचें मंत्रिमंडळ या लोकांचेंच बनविलें जात असे, तसेंच प्रांतानिहाय देखील मंत्रिमंडळें व क्षत्रपांचे खासगी अधिकारी या वसाहतवाल्या लोकांतून निवडले जात असत.

ही राष्ट्रीयत्वाची खरी कल्पना जरी सबंध इराणी राज्यांत प्राधान्येंकरून दिसून येत होती, तरी जित लोकांसंबंधीं साधारण कर्तव्यें व त्यांचे हितसंबंध यांचा योग्य विचार केला जाईल अशी खबरदारी घेतली जात असे. राजाच्या तसेंच प्रांताधिकार्‍यांच्या मंत्रिमंडळांत पर्शियन लोकांबरोबर जित लोकांचे देखील प्रतिनिधी असत. लष्करी नोकर्‍यांप्रमाणें क्षत्रपांच्या मंत्रिमंडळांतदेखील जित लोक भाग घेत असत; व पर्शियन लोकांप्रमाणें यांनांसुद्धां देणग्या व जमिनी मिळत असत. राज्यांतील सर्व जातींच्या प्रजाजनांवर सौम्य उपायांनीं राज्य करणें, गुणी लोकांचा उत्कर्ष करणें, व गुन्हेगारांचें शासन करणें हें राजाचें व अधिकार्‍यांचें आद्य कर्तव्य असे.