प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
नाणीं - खंडणीरूपानें आलेल्या मौल्यवान धातू, सुसा, पर्सेपोलिस व इतर ठिकाणच्या, खजिन्यांत गोळा करून ठेवीत असत; व जेव्हां राजास नाण्यांची गरज पडे तेव्हां तो या धातूंचीं नाणीं पाडत असे. दरायसनें नाण्यांमध्येयं सुधारणा केली. त्यानें दारिक नांवाचें (पर्शियन झारिक = सोन्याचा तुकडा) १३० ग्रेन वजनाचें व सुमारें २३ शिलिंग किंमतीचें सोन्याचें नाणें पाडिलें. एक दारिक बरोबर २० रुप्याचीं नाणीं (मीडियन शेकेल) होतीं व या रुप्याच्या नाण्यांचें वजन प्रत्येकीं ८६.५ ग्रेन व त्या वेळेच्या रुप्याच्या भावाप्रमाणें किंमत सुमारें १ शिलिंग २ पेन्स होती. सोन्याचें नाणें पाडण्याचा अधिकार फक्त राजालाच होता. परंतु रुप्याचीं नाणीं क्षत्रप, सेनानायक, स्वायत्त समाज व राज्यकर्ते राजे यांनां पाडतां येत असत.