प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
पहिला व्हिलोजिसीझ याची कारकीर्द - एक राजा काढून दुसरा बसविणें असले प्रकार पुढील काळांत वारंवार घडले. या काळांत आर्मीनियास आपल्या सत्तेखालीं आणण्याचा पार्थियनांनीं कित्येक वेळां यत्न केला; परंतु प्रत्येक वेळां त्यांनां माघारच घ्यावी लागली. अँट्रोपाटीन घराणें काढून त्या देशावर एका आर्सेसिडी राजाची स्थापना करण्यांत आली. रोमशीं प्रत्यक्ष युद्ध पहिल्या व्हिलोजिसीझच्या वेळीं (५१-७७) सुरू झालें. यानें आपला भाऊ टिरिडेटीझ यास आर्मीनियाच्या गादीवर बसविलें होतें. कांहीं काळपर्यंत युद्ध होऊन इ.स. ६३ मध्यें या दोन राष्ट्रांत तह झाला. या तहान्वयें आर्मीनियावर रोमची सत्ता प्रस्थापित झाली, तथापि टिरिडेटीझ यास आर्मीनियाचा राजा म्हणून मान्यता मिळाली. दाह व साकि (शक) लोकांच्या हल्ल्यामुळें व्हिलोजिसीझला रोमविरुद्ध केलेल्या लढाईत फार अडथळा झाला. हिर्केनिआ देश स्वतंत्र झाला. यानंतर लवकरच दक्षिण रशियांतील अँलन नांवाचे इराणी लोकसध्यांच्या ओसेट लोकांचे पूर्वज-यांनीं कॉकेशस पर्वताच्या घाटांतून येऊन मीडिया व आर्मीनिया हे देश उध्वस्त केले व पुढील शतकांत यांनीं वारंवार स्वार्या केल्या. येणेंप्रमाणें पूर्वेकडील प्रदेशांत व्हिलोजिसीझची बरीच नुकसानी झाली. याच राजाच्या कारकीर्दीत ग्रीक संस्कृतीविरुद्ध पौरस्त्य संस्कृतीच्या प्रतिक्रियेस जोर आला. दुसरा आर्टाबेनस (इ.स. १०) व त्याच्या मागून जे आर्सेसिउी राजे होऊन गेले त्यांची पूर्वीच्या राजांप्रमाणें ग्रीक संस्कृतीच्या निदान बाह्य स्वरूपाचा स्वीकार करण्याकडे तरी प्रवृत्ति नव्हती. त्यांचे आपल्या राज्याच्या पौरस्त्य रिवाजांकडेच जास्त लक्ष होते. सिल्यूशिआ शहराच्या ग्रीक संस्कृतीस प्रतिस्पर्धी म्हणून टेसिफॉन, व्हिलोजीसॉसर्टा (बालाष्कर्ट) व्हिलोजिसिअस ही शहरें वसविण्यांत आलीं.