प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

पारमार्थिक विचारांत इराणी व हिंदू भेद - जगाला अद्वैत समजणें ही दोन्ही विचारांत सामान्य कल्पना आहे. परंतु हिंदु विचारांत ईश्वर व मनुष्य यांमधील सर्व भेद नाहींसे करून एका विश्वात्म्याची कल्पना प्रस्थापित झाली आहे. तर इराणी विचारांत व्यावहारिक जीवित, जग व नैतिक आदेश यांचेंच महत्त्व मानलें आहे. इराणी पारमार्थिक विचारांतील प्राचीन देवता उत्तरकालीन नैतिक शक्ती झाल्या तर हिंदूंत त्या यथार्ह देवता झाल्या. हे फरक झरथुष्ट्री संप्रदाय व दरायसचे पापनिवेदन' यांमध्यें सांपडतात एवढेंच नव्हे तर इराणांतील सुफी पंथाच्या गूढ तत्त्वज्ञानांत देखील आढळतात.

झरथुष्ट्राचा काळ व ठिकाण याची माहिती पारशी दंतकथांवरून मिळत नाहीं.

झरथुष्ट्राची मतें मीडियामध्यें ख्रिस्ती शकाच्या ७१४ वर्षे पूर्वी प्रचलित होतीं, आणि तो धर्मसंस्थापक म्हणून बराच आगोदर प्रसिद्ध झाला असावा. कांहीं तो त्याहिअगोदर झाला असावा अशी मांडणी करतात, तर कित्येक त्याला बुद्धपूर्व ठरविण्यास निश्चित आधार मागतात. त्याच्या काळाविषयीं निश्चयात्मक पुरावा उपलब्ध नाहीं.

झरथुष्ट्री पंथाचा प्रसार इराणांत कसा झाला याबद्दल माहिती मिळत नाहीं. पश्चिमेस मीड व पर्शु लोकांमधील प्रचलित धर्मांचे संरक्षक व प्रचारक यांच्या समूहास मगी म्हणत असत. हे लोक स्वप्नांचें अर्थ व भविष्यकथन करीत असत. धर्मविधी व मंत्र या लोकांमध्यें फार प्रचलित होते. पुढें मगी याचा मांत्रिक-धर्मोपदेशक असा अर्थ होऊं लागला. यांचा हिंदुस्थानांतहि प्रवेश झाला, आणि मग ब्राह्मण या नांवानें हे आज वावरतात. झरथुष्ट्र धर्म आणि पर्शूंचा प्राचीन धर्म यांत फरक पुष्कळ आहे. पारशांच्या धर्माचा संस्थापक झरथुष्ट्र मुळींच नव्हे. तो त्यांत फेरफार करणारा सुधारक असावा. मग धर्म हा श्रौतस्मार्त धर्मासमान धरला तर, झरथुष्ट्रधर्म हा उपनिषद् धर्माप्रमाणें आहे असें म्हणतां येईल.