प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
प्राचीन इराणी इतिहासाचीं साधनें - ग्रीक लोकांनीं इराणी राज्याचा इतिहास वारंवार लिहिला होता. आज उपलब्ध असलेला अतिशय पुरातन ग्रंथ हिरोडोटसचा आहे. या ग्रंथांत ख्रि. पू. ४७९ पर्यंतच्या काळाविषयीं विपुल व महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती अंशतः ऐकीव दंतकथा व अंशतः प्रत्यक्ष ज्ञान या दोन साधनांपासून गोळा केली आहे.
हींत दंतकथा पुष्कळच आहेत, पण पुष्कळ माहिती प्रत्यक्षमूलक असल्यामुळें उपयोगी आहे. उदाहरणार्थ साम्राज्याचे प्रांत, त्यांची व्यवस्था, राजकीय रस्ते, क्सर्क्सीझच्या सैन्यांतील निरनिराळ्या राष्ट्रांचे लोक यांविषयीं माहिती खरी समजण्यांत येते. हिरोडोटसच्या ग्रंथांत ऐतिहासिक प्रसंग वर्णन करतांना देखील सायरस व क्रीसस यांच्या गोष्टी व बाबिलोन जिंकणें यांसारखे काल्पनिक भाग आहेतच. चाळीस वर्षांनंतर (ख्रि. पू. ३९०) 'मोठ्या' राजाच्या नोकरींत सतरा वर्षे (ख्रि. पू. ४१४-३९८) असलेला नायडसचा वैद्य टीसिअस यानें इराणी इतिहासावर मोठा ग्रंथ रचला. फोशिअसमधील उतारा व इतर असंख्य त्रोटक वर्णनें यांवरून या ग्रंथाची आपणांस माहिती मिळते. हिंदुस्थानावर हिंदुस्थानच्या इतिहासाच्या दृष्टीनें कुचकामाची पण हिंदुस्थानासंबंधानें ग्रीक कल्पनांची द्योतक माहिती देणारा ग्रंथकार हाच होय. हिरोडोटसपेक्षां टीसिअसला इराणी मतें व संस्था यांची जास्त स्पष्ट माहिती होती; व त्याला स्वतःला ठाऊक असलेल्या गोष्टींविषयीं लिहितांना तो फार उपयुक्त माहिती देतो. उलट पक्षीं पुरातन कालासबंधींच्या त्याच्या लेखांत मात्र हिरोडोटसच्या काळापासून त्याच्या काळापर्यंत दंतकथा किती निकृष्टावस्थेस पोंचल्या हें चांगलें दिग्दर्शित होतें. या कालासंबंधाची त्याची माहिती कांहीं तुरळक गोष्टींतच तिचा सावधगिरीपूर्वक उपयोग केल्यास कामास पडूं शकते. कॉलोफॉनच्या डायनॉनचा मोठा ग्रंथ याहिपेक्षां जास्त महत्त्वाचा होता. सायमीचा हेराक्लायडीझ याच्या ग्रंथामधील कांहीं विधानें विशेषतः इराणी संस्थांविषयीं महत्त्वाची माहिती देतात. याशिवाय इतर ग्रीक इतिहासकारांचा (थ्युसिडिडीस, एफोरस, थीओपॉम्पस वगैरे व अलेक्झांडरसंबंधीं इतिहास) व सर्वांत महत्त्वाचा म्हणजे 'ॲनॅबॅसिस हेलेनिकामधील' झेनोफनचा आधार आहे. सायरोपीडिआ ग्रंथ फारशी मदत करीत नाहीं. हा ग्रीक संस्थांसंबंधीं एक नीतिपर अद्भुतकथात्मक ग्रंथ असून इराणी राज्याविषयीं खरी हकीकत या ग्रंथांत क्वचितच सांपडूं शकेल. यहुदी साधनांपैकीं, एझरा व नीहेमायस यांचे समकालीन ग्रंथ व बर्याच अलीकडील एसटरच्या अद्भुत कथांतील विधानें थोडीं विशेष महत्त्वाचीं आहेत. बिरोससच्या बाबिलोनच्या इतिहासांत बरीच महत्त्वाची व विश्वसनीय माहिती होती, परंतु यापैकीं जवळ जवळ कांहीं एक शिल्लक राहिलेलें नाहीं. अकिमिनियन कालच्या इतिहासाची एतद्देशीय दंतकथांस पूर्ण विस्मृति झाली असली पाहिजे असें दिसतें.