प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

प्राचीन परमार्थसाधनांत सुधारणा -   इराणच्या पलीकडे म्हणजे तुर्कस्थानांत धर्मविषयक क्रांन्ति झाली नाहीं असें नाहीं. अरब, यहुदी आणि बाबिलोनी यांचा पैतृक धर्म एकच होता आणि विधिविषयक सादृश्येंहि अनेक असत. समाजांतील पुरोहित वर्ग दैनिक कृत्यें, आचार, प्रायश्चितें आणि शकुन सांगण्यांत म्हणजे सामान्य प्रतीच्या आथर्वण कर्मांत गढला असतांहि त्यांच्यामध्यें आरण्यक कालामध्येंच द्रष्टे आणि प्रवक्ते बाहेर पडण्यास सुरुवात झाली. देव अंगांत येतो आणि व्यक्ति जे आवेश करते ते ईश्वराचे वाचक होत अशा तर्‍हेची कल्पना पूर्व आशियांत बरीचशीं प्रचलित होती. यहुद्यांमध्यें जे प्रवक्ते होऊन गेले त्यांचे अर्थात् विधीपेक्षां अन्तःकरण, विचार, राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा इत्यादि गोष्टींकडे लक्ष असे. आणि आचारयुक्त धर्मावर विचार व आवेश यांचें कलम व्हावयास सुरुवात झाली. तथापि ही प्रवक्तयांची परंपरा जुन्या वैधधर्मांचें उच्चाटन करूं शकली नाहीं; तर वैध धर्म हा कायम राहिला आणि प्रवक्तयांचीं वाक्यें हीं तात्पुरतीं करमणुकीचीं वाक्यें बनलीं एवढेंच.

ग्रीकांमध्यें तत्त्वज्ञानाचा काल बुद्धाशीं समकालीनच आहे. त्यांच्या तत्त्ववेत्त्यांच्या परंपरेचा प्रथम दीप पायथॅगोरस होय. याच्या मतांमुळें याचा भारतीयांशीं कसाबसा संबंध आला असावा असे विचार व्यक्त झाले आहेत.

झरथुष्ट्र संप्रदायाचा परिणाम यहुदी मंडळींवर काय झाला असावा याविषयीं एकदम निश्चयानें सांगतां येत नाहीं. ईश्वर आणि सैतान हे द्वैत मगांच्या संस्कृतींत उत्पन्न झालें किंवा पर्शुभारतीय काळीं उत्पन्न झालें, आणि तें हिंदुस्थानांत जरी आलें नाहीं तरी यहुद्यांत मात्र शिरलें; आणि असुरदेवता बाबिलोनियांत शिरली या गोष्टी सुप्रसिद्धच आहेत. परंतु हा झरथुष्ट्रपूर्व संबंधाचा परिणाम होय. झरथुष्ट्रोत्तर पारशी मतांचा आणि पर्शूंच्या जुडीयावरील विजयाचा तत्कालीन बौद्धिक देवघेवीवर काय परिणाम झाला हें सांगतां येण्याजोगें नाहीं. कां कीं, त्या कालांतील यहुद्यांचा इतिहास देखील इतका लुप्‍त आहे कीं, अनेक जातींचे आणि राष्ट्रांचें वर्णन करणार्‍या हिरोडोटसनें यहुद्यांचा उल्लेख देखील केला नाहीं.

बुद्धोत्तर काळ आणि इराणी सत्तावर्धनाचा काळ यांतील एक महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे ख्रिस्ती संप्रदायाचा उदय झाला, त्यास बुद्धाचा संप्रदाय किती कारण झाला असावा याविषयीं वरीच चर्चा करण्यांत येते. त्या चर्चेचे फल विंटरनिट्झ येणेंप्रमाणें संक्षेपितो. विंटरनिट्झाचें मत आपल्या कडील कोणी लायख ग्रंथकारानें पद्धतशीर तपासलें नाहीं. आणि आपली बाजू चांगल्या तर्‍हेनें मांडण्याइतका परिश्रम कोणीच भारतीयानें केला नसल्यामुळें एका पाश्चात्य पण प्रामाणिक पंडिताचें मत केवळ मांडण्यापलीकडे आम्हांस कांहीं करतां येत नाहीं. विंटरनिट्झनें दिलेले आधार आम्ही तपासूनहि पाहिले नाहींत, आणि त्यामुळें ते येथें उद्‍धृतहि केले नाहींत.