प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
बुद्ध व ख्रिस्त यांच्या जन्मासंबंधीं कथांचा विचार - ख्रिस्त आणि बुद्ध यांच्या चमत्कारयुक्त आधानकालाविषयीं व जन्मकालाविषयीं एडमंडसनें दिलेले तुलनात्मक मूल उतारे जर कोणीं नुसते वाचले तरी त्यांतील फरक ताबडतोब स्पष्टपणें दिसूं लागतात. दोघांच्याहि बाबतींत त्या त्या वेळी चमत्कार घडून आले हें खरें आहे. पण धर्म, पुराणें व प्रचलित दन्तकथा यांच्या इतिहासावरून आपणांस असा बोध होतो कीं, सर्व थोर माणसांच्या जन्मासंबंधानें अशा तर्हेचे चमत्कार सर्वत्रच आढळतात. कन्यकाजात ख्रिस्तकथेशीं बुद्धकथेपेक्षां अधिक निकट साम्य असलेल्या अशा गोष्टी ग्रीक पुराणांत आढळतात. उलट पक्षीं बुद्ध हा विवाहित राणीच्या पोटीं जन्मास आला होता, कुमारिकेच्या पोटीं नव्हता. तसेंच बुद्धाला मारनें व ख्रिस्ताला सेटननें पाडलेल्या मोहाबद्दलच्या उतार्यांतहि सारखेपणापेक्षां फरकच अधिक आहेत. झरथुष्ट्राला अहरिमननें पाडलेल्या मोहाच्या कथेवरूनहि हेंच सिद्ध होतें कीं, ग्रंथांतून आधार घेतल्याचा प्रकार यांत असणें शक्य नाहीं; फार तर हा धर्मविषयक इतिहासांतील प्राक्कालीन संबंधाचा एक प्रकार आहे असें म्हणतां येईल. त्याचप्रमाणें, येशूच्या दिव्य स्वरूपप्राप्तीच्या कथेमध्यें आणि बुद्धाच्या देहदैदीप्यतेच्या महापरिनिब्बानसुत्तांतील वर्णनामध्यें तुलना करून पाहतां त्यांत फार आश्चर्यकारक सादृश्य दिसतें, व सांप्रदायिक इतिहासांत तें एक कौतुकस्थानच होय असें वाटतें. परंतु तेवढ्यावरून तद्विषयक कल्पना कोणी कोणापासून ग्रहण केल्या आहेत असें बिलकुल म्हणतां येत नाहीं.