प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

बाबिलोनिया व इजिप्‍त - राज्यांत सामील केलेलीं बाबिलोन व इजिप्‍त हीं सुधारलेलीं संस्थानें कोणत्याहि क्षत्रपीला जोडलेली नव्हतीं. नाबोनिडासचा पराभव केल्यानंतर सायरसनें आपणांस 'बाबेलचा राजा' म्हणवून घेतलें. त्यांचप्रमाणें कंबायसिसनेंहि इजिप्‍तमध्यें फेरोच्या सर्व पदव्या धारण केल्या असल्याचें आढळून येतें. दरायसनें तर इजिप्‍तमध्यें तेथील पुरोहितांनां त्यांच्या कार्यांत मदत केली, नवीन देवळें बांधलीं व नवीन कायदे जुन्या पद्धतीवरच केले. या राजांचा असें करण्यांत, जित राष्ट्रांतील लोकांनां आपले जुनेंच राज्य अद्याप कायम आहे असें वाटावें हा हेतु होता हें उघड आहे. परंतु दरायसला त्याच्या आयुष्यांतच त्याचें धोरण चुकलें असल्याचें प्रत्यक्ष अनुभवानें कळून आलें. ख्रि. पू. ४८६ या वर्षी इजिप्‍तनें बंड केलें व तें पुढें क्सर्क्सीझनें ख्रि. पू. ४८४ मध्यें मोडलें. बहुधा यामुळेच दरायसनें ख्रि. पू. ४८४ मध्यें 'बाबेलचा राजा' ही पदवी टाकून दिली, व बेल-मार्डुकची सुवर्णमूर्ति तेथील देवळांतून काढून टाकली. या योगानें बाबिलोनमध्यें ख्रि. पू. ४८४त व ४७९त अशीं दोन बंडें झाली, पण त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यांत आला.