प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

बौद्ध वाङ्‌मयाचा ख्रिस्ती वाङ्‌मयावर अप्रत्यक्ष परिणाम - उपर्युक्त विवेचनावरून बौद्धवाङ्‌मयाचा शुभ वर्तमानावर प्रत्यक्ष परिणाम झाला नसला पाहिजे हें उघड सिद्ध होतें. तथापि हें निश्चित दिसतें कीं, अलेक्झांडर बादशहाच्या वेळेपासून आणि विशेषतः रोमन साम्राज्याच्या काळी हिंदुस्थान व प्राश्चात्त्य देश यांच्यामध्यें व्यापारी दळणवळण आणि बौद्धिक संबंध पुष्कळ असल्यामुळें बौद्ध सांप्रदायिक कल्पना व बौद्धकथा यांची उडत उडत माहिती शुभवर्तमानकथालेखकमंडळास असणें अगदीं संभवनीय आहे.

तथापि पाश्चात्त्य देशांत बौद्धधर्माविषयींची माहिती असल्याचा निश्चित पुरावा इ.स. च्या २ र्‍या व ३ र्‍या शतकापासून पुढील आपणांस उपलब्ध झाला असून बनावट प्रक्षिप्‍त शुमवर्तमानेंहि त्याच काळांत निर्माण झालेलीं आहेत; म्हणूनच त्यांत बौद्ध वाङ्‌मयांतून निस्संशय उसन्या घेतलेल्या अशा गोष्टींची मालिकाची मालिकाच दाखवितां येते.

त्याच प्रमाणें हीहि गोष्ट पूर्ण मान्य झाली आहे कीं, मध्ययुगांतील सर्व ख्रिस्ती समाजांत लोकप्रिय झालेलें पुस्तक म्हणजे बार्लाम व जोसाफेट यांची एक गोष्ट असून ती एका ख्रिस्तभक्तानें बुद्धकथेच्या आधारावर लिहिलेली होती, आणि त्याला त्या बुद्धकथेची माहिती ललितविस्तरांतून मिळाली असावी. ही सर्व गोष्ट जरी वस्तुतः पूर्णपणें ख्रिस्ती भावनांनीं भरलेली आहे, तरी तिची रचना अगदीं बौद्ध पद्धतीवर केलेली आहे; बुद्धकथेंतील मुख्य प्रकार - तीन सहली त्यांमध्यें म्हातारपण व रोग आणि मृत्यु यांबद्दलचे बोधिसत्त्वाच्या मनावर झालेले परिणाम - हींत व्यक्त झाले आहेत; मधून मधून घातलेल्या दृष्टांतकथांपैकीं कांहीं कथा (उ. 'कूपांतल्या माणसाची' गोष्ट) हिंदु वाङ्‌मयांत नेहमीं आढळणार्‍या आहेत; आणि त्या खुद्द गोष्टीमध्येंहि हिंदुस्थानाबद्दल उल्लेख आहेत. स्टीन, ग्रुनवेडेल आणि व्हि. ली चॉक यांनां खोतान आणि टूर्फन येथें ज्या गोष्टी सांपडल्या त्यांवरून आपणांस अशी माहिती मिळते कीं, पूर्व इराणांत किंवा मध्य आशियांत झरथुष्ट्रसंप्रदायी लोक, बौद्ध लोक, ख्रिस्ती लोक आणि मणिसंप्रदायी लोक अगदीं शेजारीं शेजारीं रहात असल्यामुळें त्या वेळीं एखाद्या मठवाश्याला बुद्धकथेची सहजासहजीं माहिती होणें शक्य होतें, व म्हणून ख्रिस्ती धर्मतत्त्वें शिकविण्याकरितां तशीच एखादी गोष्ट लिहिण्याची स्फूर्ति होणेंहि साहजिक आहे.

ही गोष्ट बहुतकरून ६ व्या किंवा ७ व्या शतकांत प्रथम पहलवी भाषेमध्यें व नंतर भाषांतर करून अरबी व सीरियन भाषांमध्यें लिहिली गेली असावी. जॉर्जियन व ग्रीक भाषान्तरें यांचा माग मागें सीरियनप्रतीपर्यंत लावतां येण्यासारखा आहे. ग्रीक प्रतीवरून नंतर अरबी, हिब्रू, इथिओपी, आर्मीनियन, रशियन आणि रोमानियनमध्यें तर्जुमे झाले. पुष्कळशा यूरोपीय भाषान्तरांचा व तर्जुम्यांचा - लोप डी व्हेगानें या विषयाचें नाटय दृष्टीनें विवेचन केलें आहे - ग्रीकवरून झालेल्या लॅटिन भाषान्तरापर्यंत माग लावतां येतो. जर्मनभाषेंत १२२० पासून झालेले तर्जुमे आहेत. कित्येक शतकांच्या या कालामध्यें या गोष्टींतील व्यक्तींशीं ख्रिस्ती लोकांचा इतका परिचय झाला आहे कीं, श्रद्धाळू ख्रिस्ती लोकांनां, त्या व्यक्ती खरोखरच होऊन गेल्या व त्यांनीं लोकशिक्षणाचें काम केलें असें वाटतें. कॅथोलिक पंथामध्यें तर या गोष्टींतील दोघां नायकांनां बार्लाम आणि जोसाफेट यांनां शेवटीं साधू मानूं लागले. परंतु वस्तुतः जोसाफेट ही बोधिसत्त्वाशिवाय दुसरी तिसरी कोणी व्यक्ति नाहीं. ग्रीक जोसफ = अरबी जुडासफ = वुडासफ उर्फ बोधिसत्त्व. अरबी, सीरियन व पह्लवी लिपींत ज आणि ब यांचा घोटाळा होतो. बार्लाम साधूला अरबीमध्यें बालौहर नांव असून तें कदाचित् भगवानपासूनहि निघालें असेल. ही हिंदुस्थानांतील बुद्धकथा मध्ययुगांतल्याप्रमाणेंच आपल्या चालू कालांतहि अतिशय प्रचलित आहे; आणि तिची काव्यमय व नाटयमय प्रतिकृति करण्याची तिनें कवींनां पुनः पुन्हां स्फूर्ति उत्पन्न केली आहे. उदाहरणार्थ, इंग्रज कवि एडविन आर्नाल्डच्या ''आशियाचा प्रकाश'' या महाकाव्यानें १९ व्या शतकामध्यें सुद्धां इतका प्रेमादर उत्पन्न केला होता कीं, इंग्लंडमध्यें त्या काव्याच्या साठावर आवृत्त्या निघाल्या, अमेरिकेमध्यें शंभराहून अधिक निघाल्या, इतकेंच नव्हे तर त्याचें जर्मनमध्येंहि भाषांतर झालें आहे. जर्मन कवि जोसेफ हिक्टर विडमननें तर आपल्या ''बुद्धा'' मध्यें प्राचीन हिंदी कथेंतील जवळ जवळ कांहींच भाग गाळला नाहीं म्हटलें तरी चालेल. बौद्ध धर्मांतील मूलभावना आणि बौद्धधर्माचें वळण यांचा बराचसा अंश त्याच कवीच्या ''साधू व जनावरें'' या छानदार काव्यामध्यें उतरला आहे. या बुद्धकथेला फर्डिनांड हॉर्मस्टेइननें जर्मनभाषेंत नाट्यस्वरूप दिलें. त्याच्या ''बुद्ध'' नाटकाचा प्रयोग इ.स. १९०० मध्यें म्यूनिकमधील हॉफथिएटर (दरबार नाटकगृह) मध्यें करण्यांत आला.

ही बुद्धकथा रिचर्ड वॅग्नरच्या पुस्तकांतून अद्याप जिवंत आहे. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत वॅग्नर हा स्वभावाबद्दलच्या प्रश्नांत गुंतला होता; आणि वॅग्नरच्या मृत्यूनंतर, तो कवि ''बुद्ध'' नांवाचें संगीत नाटक लिहिण्याच्या उद्योगांत होता अशी अफवाहि उठली होती. अशी अफवा उठणें साहजिक असलें तरी ती निराधार होती हें मात्र खरें आहे. स्वतः त्या कवीनें विंटरनिट्झ याला ता. २७ आगस्ट १९०५ रोजीं लिहिलेल्या एका पत्रावरून असें दिसतें कीं, बुद्ध काव्य म्हणजे आधुनिक स्वतंत्रविचारदर्शक मतांचें पौरस्त्य पोषाखांतील वेषांतर होय.