प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

मझ्दक पंथ व पहिला खुशरू - कवध जोरदार राजा होता. त्यानें देशास शांतता व सुव्यवस्था प्राप्‍त करून दिली. ५०२ मध्यें त्यानें रोमन लोकांवर स्वारी करून अमायडाचा नाश केला. परंतु इकडे हूण लोकांची स्वारी झाल्यामुळें त्याला रोमन लोकांशीं तह करावा लागला. ५२७ मध्यें त्यानें रोमन लोकांशीं फिरून युद्ध सुरू करून ५३१ मध्यें कॅलिनिकम येथें त्यांचा पराभव केला. ५३२ मध्यें त्याचा मुलगा पहिला खुशरू (५३१-५७९) यानें जस्टीनिअन ह्या रोमन बादशहाशीं तह केला. पहिल्या येझ्देगर्दाप्रमाणेंच याचाहि जुन्या सांप्रदायिक मतांवर विश्वास नव्हता. मझ्दक नांवाच्या धर्मसंस्थापकावर त्याची मर्जी होती, व त्याच्या तत्त्वांप्रमाणें याचा सरदार लोकांची चैनबाजी कमी करण्याचा विचार होता. लोकांचेहि या पंथाला पाठबळ होतें. परंतु मगांच्या चळवळीमुळें त्यास या पंथाचें निर्मूलन करावें लागलें. खुशरूच्या करकर्दीत सरकारीरीत्या अवेस्ताचा सटीक ग्रंथ प्रसिद्ध करण्यांत आला; व झरथुष्ट्री संप्रदायाचा त्याग करणारास देहान्त शिक्षा होऊं लागली.

खुशरू हा एक मोठा राजा होऊन गेला. याच्या वेळेस करांची फेरतपासणी केली जाऊन न्याय्य रक्कम आकारण्यांत येऊं लागली. याच्या कारकीर्दीत रोमन लोकांशीं दोन युध्दें झालीं. त्यांपैकीं पहिल्यास ५४० व सुरुवात होऊन तें ५६२ च्या तहानें बंद झालें, व दुसरें ५७७ त झालें. यानें काळा समुद्र व कॉकेशसपर्वतापर्यंत आपलें साम्राज्य वाढविलें होतें. ५७० मध्यें त्यानें येमेनच्या अरब लोकांनां अबिसिनियन ख्रिस्ती लोकांविरुद्ध मदत केली होती; व वेळेपासून महंमदाचे अनुयायी घेईपर्यंत हा प्रांत इराणी साम्राज्यांतच मोडत होता.