प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
मणिसंप्रदाय आणि ख्रिस्तीसंप्रदाय - ख्रिस्ती संप्रदायाविषयीं मणीचें ज्ञान कितपत होतें, त्या संप्रदायाचा त्यानें कितपत उपयोग केला व कोणत्या मार्गांनीं त्याला तसें करतां आलें, हें ठरविणें फार कठिण आहे. एवढें मात्र सांगतां येईल कीं, कॅथोलिक पंथांतून त्यानें आपल्या संप्रदायाकरितां कांहींएक उचलिलें नाहीं. बॅसिलिडी, मार्शनाईटी यांसारख्या शाखांतून प्रतिपादिलीं जाणारीं तत्त्वें तोच खरा ख्रिस्ती संप्रदाय व इतर संप्रदायांशीं तुलना करतां हाच महत्त्वाचा व टिकाऊ संप्रदाय होय, असें त्याचें मत होतें. ह्या ख्रिस्ती संप्रदायापासून त्यानें 'पर्वतावरील व्याख्यानें' व इतर कांहीं गोष्टी घेतल्या आहेत. मार्शनाइटी संप्रदायाचाहि त्याच्या मतांवर कांहींसा पगडा बसला होता. गॉस्पेलमधील ऐतिहासिक मजकुराच्या कांहीं भागाचें त्यानें आपल्या मतांनां साजसशा रीतीनें उद्धाटन केलें आहे.