प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
मणिसंप्रदायाचा उदय - इसवी सनाच्या तिसर्या शतकाच्या अखेरीस पश्चिम यूरोप खंडांत दोन बलाढ्य उपासनासंप्रदायांचा एकमेकांशीं झगडा चालू होता. मिथ्रोपासना ही पूर्णांशानें इराणी होती; व ख्रिस्ती संप्रदाय हा यहुदी संस्कृतींत जन्म पावून, कांहीं इराणी संस्कृतींतील अंश त्यामध्यें आला होता. मिथ्रोपासनेचा अंमल, बाल्कन द्विपकल्प, इटाली, र्हाईन नदीच्या कांठचा प्रदेश, ब्रिटन, स्पेन इत्यादि मुलुखांवर चालत असे. मुख्यतः, रोमन पलटणींतले शिपाई जेथें जात तेथें ही उपासना आपल्याबरोबर नेत असत. शिपाई लोकांनां, ते रक्तपात करून पोट भरतात म्हणून ख्रिस्ती संस्कार वर्ज असत; व त्यामुळें त्यांच्याकडून मिथ्र संप्रदायाला अनायासेंच चांगली पुष्टि मिळत असे. आत्मनिग्रह, मनोधैर्य व निःस्पृहता हीं बिंबवून अंतःस्वास्थ्य देण्याच्या कामीं हे दोन्हीहि संप्रदाय सारखेच तयार असत. पुढें चवथ्या शतकांत, मिथ्रोपासनेवरचा लोकांचा विश्वास तिच्यांतील कथापुराणें व जगदुत्पत्तिशास्त्र यांच्या भारूडामुळें उडाला; व ख्रिस्ती संप्रदायाच्या प्रसाराबरोबर चवथ्या शतकांत तो अंतर्धान पावला. तथापि त्याची जागा ताबडतोब कथापुराणें व जगदुत्पत्तिशास्त्र यांच्या बाबतींत तितक्याच इराणी कल्पनांनीं भरलेल्या मणिसंप्रदायानें घेतली. मणिसंप्रदायाचा प्रसार इतका झपाट्यानें झाला कीं, त्याच्या स्वीकारासाठीं मिथ्रोपासनेनें लोकांची मनोभूमिका अगोदर तयार करून ठेविलेली होती असें मानल्याशिवाय या चमत्काराचा उलगडा होऊं शकत नाहीं.
हा नवीन संप्रदाय मणीनें काढला असून त्यांतील तत्त्वें ख्रिस्तसंप्रदाय व जुना पर्शियन मगीसंप्रदाय ह्यांशीं जुळतात. मणिसंप्रदायाचा इतिहासकार केस्लर ह्या संप्रदायाचा उगम सेमेटिक किंवा खाल्डियापासून झाला असावा असें दाखवितो, आणि असें सिद्ध करतो कीं, असुर कथापुराणांचा पर्शूंच्या द्वारें मणीच्या मनावर बराच संस्कार झाला होता.