प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

मझ्दकाचें चरित्र - मझ्दक हा बामदाघ नांवाच्या सुशिएना येथें राहणार्‍या इराणी गृहस्थाचा मुलगा होता. त्यानें इ.स. च्या ५ व्या शतकाच्या शेवटीं समाजसत्ताक पद्धतीचा पंथ स्थापिला. हा पंथ पुढें सस्सन घराण्याच्या साम्राज्यांत बराच बलिष्ठ बनला. कित्येक म्हणतात, या पंथाचा मूल संस्थापक खुरगानचा मुलगा झरथुष्ट्र हा असून त्याच्याच अनुरोधानें मझ्दक यानें या पंथाचा प्रसार लोकांमध्यें केला. खरा मूळ संपादक कोणीहि असो, मझ्दक याच्या नेतृत्वाखालीं हा पंथ फार महतत्वास चढला यांत शंका नाहीं. मझ्दकला यश येण्यांत इराणांतील त्या वेळची अराजकता बर्‍याच अंशीं कारण झाली. इ.स. ४८८ मध्यें गादीवर बसलेला कबध सम्राट याला त्याच्या सरदारांनीं आणि झरथुष्ट्र सांप्रदायिक धर्माधिकार्‍यांनीं फार विरोध केल्यामुळें त्यानें मझ्दक पंथाचा स्वीकार केला. कवधला त्याच्या राज्यांतील सत्ताधारी वर्गानें पदच्युत करून त्याचा भाऊ जामास्प याला गादीवर बसविलें, परंतु थोडक्याच वर्षांनीं मझ्दक पंथी लोकांच्या मदतीनें कवधनें आपलें राज्य परत मिळविलें. पुढें कवधचें मझ्दक पंथाला फारसें साहाय्य झालें नाहीं. मझ्दकच्या मरणाच्या सुमारास इराणच्या गादीच्या वारसाबद्दल तंटा उपस्थित झाला. कवधचा जो मुलगा मझ्दक पंथाला अनुकूल होता, त्याला गादीवर बसविण्याकरितां मझ्दक पंथ व खुशरू राजपुत्राला सम्राटाच्या संमतीनें गादीवर बसवूं पहाणारे झरथुष्ट्र पंथी धर्माधिकारी यांच्यामध्यें मोठा सामना झाला. ख्रिस्ती बनलेल्या टिमोथेऊस नांवाच्या एका इराणी अधिकार्‍यानें या तंट्यासंबंधानें असें लिहून ठेवलें आहे कीं, कवधनें मझ्दक पंथीयांशीं समेट करण्याचें ढोंग करून स्वतःची गादी मझ्दकपंथी राजपुत्रास देण्याचा एक दिवस मुक्रर केला व त्या दिवशीं तो समारंभ पहाण्याकरितां मझ्दकी पंथाच्या लोकांनां बायकांमुलांसह टेसिफॉन येथें एकत्र बोलाविलें; आणि नंतर विश्वासघात करून आपल्या सैनिकांकडून त्यांची कत्तल करविली. नंतर त्या पंथाच्या उरल्यासुरल्या लोकांनांहि पकडून जाळण्याचा आणि त्यांची मालमत्ता जप्‍त करण्याचा हुकूम सोडला. ही कत्तल खुशरू राज्यावर आल्यावर झाली असें बहुतेक मुसुलमान लेखक म्हणतात; पण वास्तविक खुशरू राज्यावर येण्यापूर्वीच (इ.स. ५३१) दोनतीन वर्षे व त्याच्याच चिथावणीवरून ती झाली असली पाहिजे असें दिसतें. या कत्तलीच्या वेळीं खुशरूनें जो क्रूरपणा दाखविला त्यावरून त्याला अनुशक्रुबान (अनुशर्वान, नुसिर्वान) असें उपनामहि मिळालें असें म्हणतात. खुशरूनें अनेक उपायांनीं या पंथाचा पूर्ण नायनाट केला, व मझ्दक पंथाचें इतिहासांत यापुढें मुळींच नांव आढळत नाहीं. तथापि हा पंथ सर्वस्वीं नष्ट झाला असें दिसत नाहीं. पुढें मुसुलमानी रियासतींत ॲटिनोमि नांवाचे जे अनेक पंथ निघाले ते मझ्दक पंथांतूनच उद्‍भवले असावेत असें जे कित्येकांचें म्हणणें आहे, ते संभवनीय दिसतें.