प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

मझ्दकाचा समाजसत्तावाद - राष्ट्रांतील संपत्तीवर सर्वांचा सारखा हक्क आहे हें तत्त्व मान्य केलें म्हणजे त्यापासून समाईक मालकी, गरीब, श्रीमंत इत्यादि समाजांतील वर्गवारीचें निर्मूलन आणि स्त्रीपुरुषसंबंधांत विवाहबंधनाचा अभाव हे सिद्धांत न्यायतःच निघतात. यांपैकीं खुद्द मझ्दकला कोणते सिद्धांत किती प्रमाणांत मान्य होते हें पाहिलें पाहिजे. तिसर्‍या म्हणजे विवाहसंस्थेसंबंधानें पाहतां खुशरूच्या राज्यारोहणाप्रसंगीं केलेल्या भाषणावरून (तबारी १. ८९६. १५ २ नोल्डेके पान १६०) असें दिसतें कीं, त्या वेळीं धर्मबंधनें बरींच नष्ट झालीं होतीं व अनेकांचें नुकसान झालें होतें. त्या लोकांनां नुकसान भरपाई देण्याकरितां आणि बिनवारसी मुलांची व्यवस्था करण्याकरितां खुश्रूला बरेच नवे नियम करावे लागले. यावरून मझ्दकनें समाजव्यवस्थेंत बरीच क्रांति उडवून दिली होती व वरिष्ठ वर्गांनां त्याच्या पंथाच्या लोकांकडून मोठा त्रास भोगावा लागला होता असें दिसतें. या परिस्थितीवर प्रतिपक्षी लेखकांनीं बराच जोर दिलेला आहे व त्यांच्या वर्णनांत तथ्यांशहि बराच दिसतो. कारण मझ्दक हा केवळ प्लेटोप्रमाणें तत्त्ववेत्ता नसून तो आपले सामाजिक सुधारणेचे विचार तरवारीच्या जोरावर अमलांत आणणारा क्रांतिकर्ता होता. आधुनिक समाजसत्तावादी आणि मझ्दक पंथी यांच्यामध्यें नोल्डेकेनें असा एक महत्त्वाचा फरक दाखविला आहे कीं. मझ्दकी पंथाच्या चळवळीला इतर हरएक पौरस्त्य चळवळीप्रमाणेंच धार्मिक स्वरूप फार होतें. झरथुष्ट्र पंथांतहि मझ्दक पंथाचा हा विशेष आढळतो. मझ्दकनें गुरेंढोरें मारून मांस खाण्याचें बंद केलें होतें. फर्दुसीच्या महाकाव्यांतील वर्णनावरून असे स्पष्ट दिसतें कीं, मझ्दकनें आपल्या पंथाचीं समता आणि बंधुत्व हीं तत्त्वें झरथुष्ट्राच्या मूळ स्वरूपांतल्या धर्मांतून घेतलीं होतीं. मझ्दकच्या प्रतिपक्षीयांनीं केलेलें वर्णनच खरें आहे असें मानलें तरी त्यावरून असें स्पष्ट दिसतें कीं, झरथुष्ट्राच्यांधर्मांतील अज्ञान व अनीतीचा विध्वंस करून सद्धर्म स्थापन करणें हाच उद्देश समाजसत्ताक पंथ स्थापन करण्यांत मझ्दकच्या पुढें होता. मझ्दकच्या चळवळीला विलक्षण यश येण्याचें कारण इराणी धर्मांतलीं ध्येयेंच त्यानें लोकांपुढें मांडलीं हें होय. एकंदरींत मणिसंप्रदायांतल्या तत्त्वज्ञानापेक्षां झरथुष्ट्रसंप्रदायांतील तत्त्वांचाच तो पुरस्कार करीत होता असें म्हणावें लागतें.