प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

बौद्धसंप्रदायाचा पश्चिमेकडील विचारांवर परिणाम - वर जी देवघेव वर्णन केली ती कांहीं अंशीं अज्ञातपणें झालेली असावी. परंतु जी जाणून बुजून झाली असण्याचा संभव आहे अशी देवघेव मणिसंप्रदायांत स्पष्ट झाली आहे. ज्योतिषाच्या देवघेवीसंबंधानें मतें पहिल्या विभागांत दिलींच आहेत; त्याप्रमाणेंच नाटयकलेच्या व शिल्पकलेच्या देवघेवीसंबंधानेंहि मतें तेथें आलीं आहेत. महाभारताचा प्रसार पश्चिमआशियांत झाला असावा असा तुर्की भाषेंतील अज्ञातकालीन हिडिंबवधावरून संशय उत्पन्न होऊं लागला आहे. पायथॅगोरसचा बुद्धपूर्वकालींच पुनर्जन्मावर विश्वास दिसून येत होता. तसेंच भारतीय संगीत व पायथॅगोरियन संगीत यांमध्यें असलेलें सादृश्य (विज्ञानेतिहास पृ. १८९ पहा) यांवरून बुद्धपूर्वकालीं देखील कांहींतरी बौद्धिक देवघेव असावी अशी कल्पना होते. लाउत्सेच्या ताओ विचारसंप्रदायावर जर बुद्धापूर्वीच भारतीय विचाराची छटा दिसत होती तर चीनशीं मध्यआशियामार्फत संबंध ठेवणार्‍या पश्चिमेकडे भारतीय विचाराचा परिणाम झाला असणें अशक्य नाहीं. असो.