प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
मझ्दक पंथाची तत्त्वें - मझ्दक पंथाची हकीकत स्वतंत्र उपलब्ध नसून ती त्यांच्या प्रतिपक्ष्यांच्या लेखांतूनच, कायंती मिळते. झरथुष्ट्र आणि ख्रिस्त पंथी लेखकांनीं जें या पंथासंबंधानें लिहून ठेवलें आहे त्याचा पडताळा पहाण्यास मझ्दक पंथाचें असें एकहि साधन उपलब्ध नाहीं. तबारीमध्यें या पंथाच्या तत्त्वांचें वर्णन पुढीलप्रमाणें आढळते.
'मझ्दकनें घालून दिलेल्या नियमांपैकीं एक नियम असा होता कीं. त्याच्या अनुयायांनीं सर्व मालमत्ता व कुटुंबें सर्वांच्या समाईक मालकीचीं आहेत असें समजावें. हीच अत्यंत पवित्र वागणूक होय व ती ईश्वराला सम्मत आहे; आणि असें वागल्यानेंच मनुष्याला परलोकीं सद्गति मिळते असा उपदेश त्यानें अनुयायांनां केला.
मझ्दक पंथाच्या लोकांचें असें म्हणणें होतें कीं, परमेश्वरानें मनुष्यजातीच्या निर्वाहाकरतां जगामध्यें जीं जीं साधनें उत्पन्न केलीं आहेत तीं सर्वांनीं समान मालकीचीं समजून त्यांचा उपभोग घ्यावा. परंतु ईश्वराची इच्छा न जुमानतां मनुष्य जातींनीं एकमेकांशीं अन्यायाचें वर्तन केलें आहे, सबब श्रीमंतापासून मालमत्ता हिसकावून घेऊन तिचा उपभोग घेण्याचा सर्वांना सारखाच अधिकार दिला पाहिजे. द्रव्य. स्त्रिया व इतर मालमत्ता यांवर एकाचा हक्क जास्त, एकाचा कमी असा पक्षपात कोठेंहि असतां कामा नये. मझ्दकच्या या शिकवणीचा फायदा गरिब-गुरीब जनसमाजानें घेण्याचें ठरविलें, आणि त्यामुळें मझ्दक पंथाला पुष्कळ अनुयायी मिळून तो इतका प्रबल बनला कीं, त्याच्या अनुयायांनीं लोकांच्या घरांत शिरून जुलुमानें त्यांची मालमत्ता व बायकामुलें लुबाडण्यास सुरुवात केली. त्यामुळें समाजांत इतका गोंधळ माजला कीं, प्रत्यक्ष बाप मुलाला व मुलगा बापाला ओळखीनासा झाला.' मझ्दक यानें कवध बादशहा त्याचा अनुयायी असल्यामुळें आपल्या तत्त्वाप्रमाणें त्याच्याहि एका बायकोकरितां-खुशरूच्या आईकरितां-त्याजजवळ मागणी केली होती असाहि उल्लेख आढळतो.