प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
मणिसंप्रदाय व बौद्धसंप्रदाय - ज्या अर्थी मणीनें हिंदुस्थानापर्यंत लांबलांबचे प्रवास केले होते त्या अर्थी बौद्ध संप्रदायाचें ज्ञान त्यास असलें पाहिजे. केस्लरच्या म्हणण्याप्रमाणें, मणीनें निदान नीतिशिक्षणाच्या कामीं तरी बुद्धाच्या उपदेशाचा उपयोग केला होता. मणीनें स्वतः लिहिलेल्या ग्रंथांत बुद्धाचें नांव आढळतें, त्यावरून तो नवीन संप्रदाय स्थापन करण्यांत गुंतला होता तेव्हां त्याचें लक्ष्य बौद्धसंप्रदायाकडेहि गेलें असेल असें वाटतें. मणिसंप्रदाय हा उघडउघड सर्वसंग्राहक होता. मणीचा ख्रिस्तीसंप्रदायाशीं संबंध वर व्यक्त करण्यांत आलाच आहे. मणीनें झरथुष्ट्राला देवदूतांत अंतर्भूत केलें आहे, तर बुद्धास ईश्वरी संदेशाचा निवेदक म्हटलें आहे. परंतु कांहीं बाबतींत त्याचें झरथुष्ट्र संप्रदायापेक्षां बुद्धसंप्रदायाशीं अधिक साम्य दिसतें. जगांतील वाईट गोष्टींचें निर्मूलन करणें हें झरथुष्ट्राचें ध्येय होतें, तर मणीचें ध्येय बुद्धाप्रमाणेंच जगांतील चांगल्या गोष्टींची जोपासना करणें हें होतें. बौद्ध संप्रदायाप्रमाणें मणिसंप्रदायांतहि, हिंसा निषिद्ध मानली होती तरी दुसर्यानें मारलेल्या पशूचें मांस खाण्यास हरकत नव्हती. या व इतर सादृश्यांवरून मणीचा व बुद्धाचा संप्रदाय यांत जें कोठें साम्य दिसतें तें चुकून आलेलें असेल व बौद्धसंप्रदायापासून मणीनें मुळींच कांहीं घेतलें नाहीं हें जें ब्रिटानिकाकाराचें विधान आहे त्यांत विशेषसें तथ्य असेलसें दिसत नाहीं.