प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

मणिसंप्रदायाचा थोडा इतिहास - हा संप्रदाय पहिल्यानें पूर्वेकडे इराण, मेसापोटेमिया व ट्रॅन्सआक्सियाना ह्या देशांतून चांगला रुजला गेला. मणिसंप्रदायाच्या मुख्य धर्मगुरूचें पीठ पहिल्यानें पुष्कळ शतकेंपर्यंत बाबिलोन येथें होतें, व नंतर तें समरकंद येथें गेलें. मुसुलमान लोकांच्या स्वार्‍या होत असतांना व इस्लामी धर्माचा सर्वत्र विजय होत असतांना देखील या संप्रदायाचे अनुयायी वाढत होते. त्याचीं मतें व शिस्त यांत पूर्वेकडे फारसे बदल झाला नाहीं. दहाव्या शतकाच्या अखेरीस म्हणजे ज्या वेळीं फिहरिस्त हा ग्रंथ लिहिला गेला त्या वेळीं इराणांतील व मेसापोटेमियांतील शहरांतून पुष्कळसे मणिसंप्रदायी लोक हांकून लावले गेले होते. तथापि तुर्कस्थानांत व चीनच्या सरहद्दीपर्यंत बरीच मणिसंप्रदायी लोकांची वस्ती होती. बहुतकरून मांगोल जातीच्या टोळ्यांचीं जीं आगमनें झालीं, त्यांयोगानें मध्यआशियांतील मणिसंप्रदाय पहिल्यानें बुडाला. तरी पण पंधराव्या शतकांत हिंदुस्थानांतील मलबार किनार्‍यावर, थामस - ख्रिस्ती लोकांशेजारीं मणिसंप्रदायी लोक रहात असल्याचा पुरावा सांपडतो. इ.स. २८० च्या सुमारास मणिसंप्रदाय पहिल्यानें ग्रीक-रोमनराज्यांत घुसला. चवथ्या शतकांत रोमन राज्यांत ह्याचा फार झपाट्यानें प्रसार झाला. निदान पश्चिम देशांत तरी ह्यांतील वादविवादपद्धति व ह्यानें केलेलें कॅथोलिक धर्माचें गुणदोषविवेचन यामुळें त्याची बाजू बळकट राहिली. जुना करार हा बुद्धिमान् वाचकाला बुचकळ्यांत पाडून त्याच्या मार्गांत बरेच अडथळे आणतो, व आमचा हा संप्रदाय म्हणजे केवळ जुना करार वगळून राहिलेला ख्रिस्ती संप्रदायच आहे असें ह्या संप्रदायातर्फे जाहीर करण्यांत आलें होतें. अशा रीतीनें, पश्चिमेकडे गेलेल्या मणिसंप्रदायी लोकांनीं आपल्या धर्मशिक्षणाला ख्रिस्ती मुलामा देऊन तें पाश्चात्त्य लोकांनां सुलभ व प्रिय वाटेल असें बनविलें. जसजसा हा संप्रदाय वाढत गेला तसतशीं यांत ख्रिस्ती संप्रदायाचीं तत्त्वें व उच्च तत्त्वज्ञान अधिकाधिक शिरलें. उत्तर आफ्रिकेंत तर ह्याचे फार अनुयायी होते; धर्मगुरूंचें सुद्धां चोरून मारून ह्यास पाठबळ होतें.

रोममध्यें जेव्हां ह्या संप्रदायाचें बंड फार माजलें तेव्हां तेथील बादशहांनीं त्याविरुद्ध कडक कायदे केले. उत्तर-आफ्रिकेंतहि हा संप्रदाय पुढें हळू हळू नाहींसा होत गेला. सारांश, हा संप्रदाय-मूळचा इराणचा रहिवाशी मणी यानें स्थापलेला शुद्ध संप्रदाय नव्हे तर ख्रिस्ती संप्रदायाच्या वर्चस्वानें फेरबदल झालेला मणिसंप्रदाय-कॅथोलिक पंथाबरोबर तेराव्या शतकापर्यंत राहिला; व पुढें पार नाहींसा झाला.