प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

मणिसंप्रदायाचें रहस्य - ह्या संप्रदायाचा जो इतक्या जलद प्रसार झाला व मुख्य मुख्य संप्रदायांमध्यें यानें स्थान पटकाविलें यांतील मर्म काय असा साहजिकच प्रश्न उद्‍भवतो. जुन्या कथापुराणांची सडेसोट जड द्वैतवादाशीं, जी यानें सांगड घालून दिली तिच्या योगानें या संप्रदायाला चांगला खंबीरपणा आला; शिवाय त्यांतील शिस्तवार नीतितत्त्वें व साधी मानसपूजा हीं या जुन्या जगांत उद्‍भवलेली नूतन आकांक्षा तृत्प करण्यास कारणीभूत झालीं. ह्या संप्रदायास बळकटी येण्याचें दुसरें कारण, समाजाला सोइस्कर होईल अशी मणीनें आपल्या संस्थेंत केलेली सुव्यवस्था, हें होय. ज्ञानी व अज्ञानी, प्रापंचिक व पारमार्थिक वगैरे सर्व प्रकारच्या लोकांस यांत वाव असे व जरूरीपेक्षां कोणावरहि जास्त कांहीं लादलें जात नसे. अशा रीतीनें मुळापासून वैयक्तिक गरजा भागविण्याकडे लक्ष ठेविलें गेलें होतें व वेळोवेळीं बाह्य तत्त्वांचा अंगीकार करण्यासाठीं विश्वव्यापी संप्रदायाच्या ठिकाणीं लागणारा सुज्ञपणाहि याच्या घटनेंत होता. दुसर्‍या तिसर्‍या शतकांत मानवजातीला अतिशय डोईजड वाटणारा असा हा चांगल्यावाइटासंबंधीं प्रश्न मणिसंप्रदायानें दिसण्यांत गहन पण सोप्या व सोइस्कर रीतीनें सोडवून दिला, इतकें सांगितलें असतां ह्या संप्रदायाची वाढ इतक्या झपाट्यानें कशी झाली याचें आश्चर्य वाटणार नाहीं.