प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

मणिसंप्रदायाचीं तत्त्वें :- सध्यां जगांतील प्रत्येक गोष्टींत दिसणारा विसंगतपणा व त्यांतील परस्परविरोध हीं पाहून मणीच्या विचारांची दिशा बदलली. ह्या विरोधाला कारण, जगांत दोन एकमेकांहून अगदीं भिन्न अशा वस्तू असल्या पाहिजेत असें त्याचें ठाम मत बनलें. त्या दोन वस्तू म्हणजे प्रकाश आणि तिमिर ह्या असून त्यांपैकीं प्रत्येकीचें स्वतंत्र राज्य आहे. ईश्वर हा प्रकाशांतील आदि तत्त्व आहे; शिवाय ''प्रकाशनभोमंडळ'' व ''प्रकाश धरित्री'' असे प्रकाशाच्या राज्याचे दोन भाग आहेत. तिमिर राज्यांत ''ईश्वर'' नाहीं; व त्यांत फक्त ''तिमिर धरित्री'' एवढी एकच फक्त आहे. सैतान व त्याचे गण ह्या राज्यांत उत्पन्न झाले. हीं परस्परविरुद्ध असून अनादिकालापासून ह्यांच्यांत वैरभाव आहे तो कायमचाच. प्रकाशराज्यांतल्या प्रकाशधरित्रीमध्यें सैतानानें जेव्हां फारच धुमाकूळ मांडला तेव्हां ईश्वरानें आदिपुरुषास निर्माण करून त्याला सर्व तयारीसह सैतानावर लढण्यास पाठविलें; पण ह्या लढाईंत आदिपुरुषाचा पराभव झाला. मग ईश्वर स्वतःच आपल्या नवीन देवदूतांसह त्यावर चाल करून गेला व त्याचा मोड करून त्यानें आदिपुरुषास बंधमुक्त केलें. तथापि या झटापटींत प्रकाशाच्या कांहीं भागाच्या जागीं तिमिराचा प्रवेश होऊन प्रकाशसंततींत तिमिराचे घटक जाऊन बसले. तेव्हां आदिपुरुषाला तिमिरोत्पत्तीची आणखी वाढ होऊं नये म्हणून पाताळांत उतरून तिमिराचीं मुळेंच कापून काढण्याशिवाय दुसरा मार्ग राहिला नाहीं. सध्यांच्या दृश्य जगांत दिसणारीं हीं प्रकाशतिमिराचीं मिश्रतत्त्वें आहेत. प्रकाशतत्त्वांच्या बंधमुक्ततेला सुरुवात म्हणजेच जगाची रचना. जग हें अनेक स्वर्ग व अनेक धरित्री मिळून बनलेलें आहे. सूर्य व चंद्र यांत बंधमुक्त होत असलेला प्रकाश सांठवून ठेविलेला असतो. सूर्यमंडळाच्या बारा राशींचे एक मोठें चक्र, जगापासून मुक्त झालेला प्रकाश बादल्यांनीं सूर्यचंद्रांत भरीत असतें. येथें तो शुद्ध होऊन, ईश्वराशीं संलग्न होतो.

जगाची घटना हें चांगल्या देवदूतांनीं केलेलें काम आहे. पण मनुष्योत्पत्तीशीं मात्र तिमिराधिपतींचा संबंध येतो. हें ह्या संप्रदायाचें म्हणणें निराशावादीपणाचें द्योतक आहे. सैतानानें पाप, कामुकता, लोभ इत्यादि विकाराबरोबर पहिला मनुष्य आदम याची उत्पत्ति केली. तिमिर पिशाच्चानें या पहिल्या मनुष्यांत स्वतः चोरून घेतलेला प्रकाशाचा सर्व अंश, त्याला (प्रकाशाच्या अंशाला) चांगलें कह्यांत ठेवतां यावें म्हणून घातला. ह्या योगानें त्याच्यांत विसंगतपणा आला. ईव्हला या पहिल्या मनुष्याची सहचारिणी करण्यांत आलें ती कपटी व विषयलोलुप होती, तरी तिच्यांत थोडा प्रकाशस्फुलिंग होता. येशूसारखे चांगले देवदूत पहिल्यापासूनच मनुष्यांनां ह्या सैतानी राज्यांतून मुक्त होण्याचा उपदेश करीत. आदमला त्यांनीं विषयपराङमुख करण्याविषयीं खटपट केली पण तो अखेरीस विषयेच्छेला बळी पडला. केन व एबेल हे आदमचे पुत्र नसून ते ईव्हला सैतानापासून झालेले मुलगे आहेत. प्रकाशमय सेथ मात्र आदम व ईव्ह यांचा मुलगा आहे. ह्याप्रमाणें निरनिराळ्या व्यक्तींत प्रकाशाचें निरनिराळें प्रमाण असलेली मनुष्यजात अस्तित्वांत आली. परंतु आरंभापासून सरसकट पुरुषवर्गांत हें प्रमाण स्त्रीवर्गापेक्षां जास्त होतें. दानव मनुष्याला वाईट मार्गाकडे नेत तर देवदूत त्याला चांगला मार्ग दाखवीत व शुद्ध प्रकाश मिळवून देण्याची तजवीज करीत. ह्याच कारणाकरितां, पैगंबर व खर्‍या ज्ञानाचे उपदेशक आदम, नोहा, अब्राहाम वगैरेंचा अवतार होता. माझाहि अवतार ह्याचकरितां आहे असें मणी म्हणत असे. जेव्हां प्रकाशाचीं तत्त्वें जगापासून पुरतीं मुक्त होतात तेव्हां सर्व वस्तूंचा विनाशकाळ प्राप्‍त होतो. देव, देवता, देवदूत हे सर्व एकत्र जमतात, जग वर उचलून धरणार्‍या देवता भार खालीं ठेवतात व प्रत्येक गोष्टीचा अंतकाळ प्राप्‍त होतो. जग भयंकर आगीच्या डोंबांत जळून खाक होतें व पुन्हां पूर्वीप्रमाणें दोन राज्यें अगदीं निरनिराळीं होतात. वर अगदीं उंच पुन्हां पूर्णत्वास पोंचलेलें प्रकाशाचें राज्य खालीं खोल निर्बळ झालेलें तिमिराचें राज्य-गाढ अंधकार.