प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

बौद्ध वाङ्‌मय व ख्रिस्ती संप्रदाय - जसा बौद्ध संप्रदाय हा जगांतील मोठ्या संप्रदायांपैकीं एक होऊन बसला आहे, तसाचा बौद्ध वाङ्‌मयापैकीं बराच भाग विश्व-वाङ्‌मयामध्यें मोडूं लागला आहे. बौद्ध धर्मांतील कल्पित कथा, आख्यायिका, अद्‍भुत कथा आणि दंतकथा बौद्धसंप्रदायाबरोबर पूर्व आशियामध्यें गेला इतकेंच नव्हे तर यूरोपीय वाङ्‌मयांमध्येंहि तत्समान कथा वारंवार आढळूं लागल्या. परंतु अशा उदाहरणांच्या बाबतींत बौद्धकथा यूरोपांत गेल्या असेंच सरसहा खरें ठरेल असें नाहीं, तर त्याच्या उलटहि वस्तुस्थिति कधीं कधीं असूं शकेल. बुद्धकथा व ख्रिस्तकथा याच्यामध्यें कांहीं बाबतींत साम्य आहे; आणि तिपिटकांतील व महायानसूत्रांतील सुत्तांमध्यें आलेल्या कांहीं भाषणांवरून व दृष्टान्तांवरून यूरोपीयांस ख्रिस्ती संप्रदायग्रंथांतील उपदेशांची कमीजास्त मानानें आठवण होते.

बौद्ध व ख्रिस्ती वाङ्‌मयांमध्यें अशीं साम्य-स्थलें किती प्रमाणांत आलीं आहेत व त्यांवरून काय अर्थबोध होतो हा प्रश्न अशा प्रकारचा आहे कीं, त्यांच्या परस्परसंबंधांकडे आपणांस वळलेंच पाहिजे. आतां प्रश्न असा कीं, हीं समानस्थलें केवळ साहजिकरित्या आलीं, म्हणजे त्या त्या कथांत, दृष्टांतांत व भाषणांत समान परिस्थितींमुळें व समान धर्मभावनांमुळें तीं उत्पन्न झालीं, कीं हें सादृश्य एक वाङ्‌मय दुसर्‍यावर प्रत्यक्ष अवलंबून असल्यामुळे उत्पन्न झालें ? ख्रिस्ती ग्रंथांवर तत्पूर्वकालापासून निर्माण होऊं लागलेल्या बौद्धग्रंथांचा परिणाम झाला आहे, किंवा उलट ललितविस्तार आणि सद्धर्मपुंडरीक या अलीकडच्या बौद्ध ग्रंथांवर ख्रिस्ती ग्रंथांचा परिणाम झाला आहे ? हे प्रश्न पुनःपुन्हां उपस्थित होऊन संशोधन झालेलें आहे. आणि त्यांची उत्तरें निरनिराळ्या लेखकांनीं फारच भिन्न भिन्न प्रकारचीं दिलीं आहेत.

बौद्ध व ख्रिस्ती वाङ्‌मयांतील साम्य स्थलांसंबंधीं सेडेलच्या मताचा विचार - बायबल ग्रंथांतील ख्रिस्तचरित्र व बुद्धकथा यांच्यामध्यें अनेक साम्य स्थलें असल्याचें सिद्ध करतां येईल, असें रुडॉल्फ सेडेल या लेखकास वाटत असल्यामुळें त्यानें असा सिद्धान्त काढला कीं, शुभवर्तमानलेखकांनीं सेंट मॅथ्यू आणि सेंट मार्क यांच्या पुस्तकांचा उपयोग करून शिवाय ज्यावर बौद्ध संप्रदायाचा परिणाम झाला होता अशा एका ख्रिस्ती काव्यमय शुभवर्तमानाचाहि उपयोग केला होता; आणि बौद्धग्रंथांत ज्यांचीं सादृश्यें आढळतात अशा सर्व कथा, दृष्टान्त व उद्‍गार हीं ह्यामधून घेतलीं होतीं. रुडॉल्फ म्हणतो कीं, ''अशीं सादृश्यें एकएकटीं व स्वतंत्र नाहींत तर त्यांचा बराच मोठा समुच्चय असून त्याचे विभाग पडतात; इतकेंच नव्हे तर त्या सर्वांमध्यें एकसूत्रीपणाहि दिसतो; तेव्हां अर्थात् ज्याप्रमाणें एखादी काठी मोडून टाकतां येते परंतु काठयांचें जुडगें मोडणें फार कठिण असतें व जुडग्यांचें जुडगें मोडणें तर त्याहुनहि कठिण असतें, त्याचप्रमाणें या एकंदर सदृश्य स्थलांची विल्हेवाट लावणेंहि कठिण असल्यामुळें मी म्हणतों त्याप्रमाणें सिद्धान्त काढणें केवळ अपरिहार्य आहे.'' अगदीं बरोबर ! परंतु तो जिला काठी म्हणून म्हणतो ती काठी नसून केवळ काठीचा आभास असेल तर तसल्या काठयांचें जुडगें किंवा जुडग्यांचें जुडगें असलें तरी तें आपणांस कांहीं कामाचें नाहीं. आणि खरोखर सेडेलनें दाखविलेल्या 'सादृश्यांपैकीं बहुतेक सादृश्यें सूक्ष्म परीक्षणांत टिकणारीं नाहींत असें दाखविणें कठिण नाहीं.