प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

बुद्ध व ख्रिस्त यांच्या चमत्कारांविषयीं कथा - ख्रिस्तानें केलेल्या चमत्कारांशीं साम्य असलेल्या अशा दोन गोष्टी जातकपुस्तकांत दिल्या आहेत. ज्याप्रमाणें येशूनें पांच पाव व दोन मासे एवढ्या सामुग्रीवर पांच हजार लोकांनां भोजन घातलें, त्याचप्रमाणें एका स्वयंवर्धन पावणार्‍या चपातीनें बुद्धानें पांचशें भिक्षू जेऊं घातले, असें जातकांत वर्णन आहे. आणि जसें पीटर पाण्यावरून चालत जात असतां त्याची श्रद्धा डळमळूं लागतांच तो बुडूं लागला असें वर्णन आहे, तसेंच एक श्रद्धावान् पुरुष बुद्धाविषयीं चांगले विचार असेपर्यंत नदीवरून चालत जाऊं शकला पण जेव्हां लाटांच्या भीतीनें त्याची बुद्धाविषयींची आदरबुद्धि डळमळूं लागली तेव्हां तो बुडूं लागला, असें दुसर्‍या एका जातकांत सांगितलें आहे. हे दोन्ही चमत्कार जातकटीकेमधील आद्य-कथांमध्यें मात्र सांपडतात, आणि त्या मागाहूनच्या आहेत ही गोष्ट लक्षांत घेतां त्या मूळ ख्रिस्ती धर्मांतीलच असणें अशक्य नाहीं.

ख्रिस्तोत्तर कालांतील गोष्टींत एका गरीब मुलीची गोष्ट आहे. तिनें आपलें सर्वस्व जीं स्वतःजवळ असलेलीं मातींत सांपडलेलीं दोन पितळी नाणीं ती भिक्षूंनां दिलीं; आणि त्याबद्दल तुझ्या देणगीचें महत्त्व श्रीमंतानें आपल्या सर्व मिळकतींच्या व संपत्तीच्या केलेल्या दानापेक्षां अधिक आहे अशी बुद्धानें तिची स्तुति केली. तिच्या सत्कृत्याबद्दल तिला बक्षिस मिळाल्यावांचून राहिलें नाहीं. त्यानंतर लवकरच ती त्या बाजूनें जात असलेल्या एका राजाच्या दृष्टीस पडून त्याचें प्रेम तिच्यावर जडलें व त्यानें तिला आपली राणी करून घरीं नेले.

अश्वघोषाच्या सूत्रालंकाराच्या चिनी भाषांतरांत ज्या स्वरूपांत ही कथा आपणांस आढळते त्या स्वरूपांत ती शुभवर्तमानांतील विधवेच्या अल्पदानाविषयींच्या साध्या पण सुंदर कथेहून फारच कमी दर्जाची आहे. म्हणून ही कथाहि बौद्धांनां ख्रिस्ती धर्मप्रचारकांकडून माहीत झाली असणें अशक्य नाहीं. परंतु या बौद्धकथेचें मूळ जुनें अधिक चांगलें स्वरूप नष्ट झालें असणेंहि शक्य आहे. या कथेंतील नाण्यासंबंधींच्या अगदीं किरकोळ बाबींतहि असलेलें साम्य लक्षांत घेतां हेंच अत्यंत संभवनीय दिसतें कीं, अशा प्रकारच्या बौद्ध व ख्रिस्ती कथा परस्परसंबंध असल्यावांचून उत्पन्न झाल्या नसाव्यात.

सद्धर्मपुंडरीकामधील उधळ्या पुत्राच्या गोष्टीचा सेंट ल्यूकमधील गोष्टीशीं संबंध असणें कमी संभवनीय दिसतें. याबद्दल स्वतः सेडेलसुद्धां असें म्हणतो :- ''कमलाच्या'' उपमेचें ख्रिस्ती विचाराशीं खरोखर कसलेंहि साम्य नाहीं. नाहीं म्हणावयास भटकणारा पुत्र दरिद्री स्थितींत परत येतो एवढें मात्र दोहोंत साम्य आहे. तथापि त्या दोन गोष्टींमधील तुलनेचा प्रकार पूर्णपणें भिन्न आहे.'' सेंट जॉनच्या शुभवर्तमानांतील येशू आणि सामारिआची स्त्री यांच्या गोष्टींमध्यें आणि दिव्यावदानांतील आनंद व चांडालकन्या यांच्या गोष्टींमध्यें साम्य फारसें मोठें नाहीं. शिवाय दोन्ही उदाहरणांतील मूल बौद्ध लेख ख्रिस्तोत्तरकालीन आहेत.